डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी
रोहे : प्रतिनिधी
शहरालगत असलेल्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वरमधील साईमंदिर ते निरलॉन कॉलनी (कालवा रोड) आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
साईमंदिर ते निरलॉन कॉलनी आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर गतीरोधकही मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रहदारी होत असून दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. खड्डे चुकवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.खड्ड्यांत वाहने आदळत असल्याने विशेषत: दुचाकी वाहन चालकांना कमरेचे आजार जाणवू लागले आहेत.
हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने त्याची दुरूस्ती करण्याची नितांत गरज आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.