Breaking News

ओमायक्रॉनबाबत सावधगिरी बाळगा; ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मन की बात कार्यक्रमामध्ये देशाला संबोधित केले. या वर्षातील हा शेवटचा मन की बात कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींनी या वेळी देशवासीयांना वाढत्या ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपले शास्त्रज्ञ नवीन ओमायक्रॉन प्रकाराचा सतत अभ्यास करत आहेत. त्यांना रोज नवीन डेटा मिळत आहे, त्यांच्या सूचनांवर काम केले जात आहे. अशा परिस्थितीत, स्वतःची जागरूकता, स्वतःची शिस्त, कोरोनाच्या या प्रकाराविरुद्ध देशाकडे मोठी शक्ती आहे. केवळ आपली सामूहिक शक्तीच कोरोनाला हरवेल, ही जबाबदारी घेऊन आपल्याला 2022 मध्ये प्रवेश करायचा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या शौर्याबद्दल सांगितले. त्यांनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या शेवटच्या पत्रावर चर्चा केली. त्यांनी ते पत्र विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिले असावे, पण त्यांनी ते सर्वांना उद्देशून लिहिले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन वर्षात चांगले होण्याची शपथ घ्या, असेही पंतप्रधान म्हणाले. माझ्या प्रिय देशवासीयांनो नमस्कार! या वेळी तुम्ही 2021च्या निरोपाची आणि 2022च्या स्वागताची तयारी करत असाल.  नवीन वर्षात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, येत्या वर्षात काहीतरी चांगले करण्याचा, अधिक चांगले करण्याचा संकल्प घेते. गेली सात वर्षे आमची ‘मन की बात’ देखील आम्हाला व्यक्ती, समाज, देशातील चांगल्या गोष्टी अधोरेखित करून चांगले काम करण्याची आणि चांगले बनण्याची प्रेरणा देत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये सांगितले की, या वर्षीही परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा माझा विचार आहे. या कार्यक्रमाची नोंदणीदेखील दोन दिवसांनंतर चूर्ॠेीं.ळप वर 28 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही नोंदणी 28 डिसेंबर ते 20 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यासाठी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ऑनलाइन स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत. तुम्ही सर्वांनी यात सहभागी व्हावे अशी माझी इच्छा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

-बूस्टर डोस’ कधी आणि कुणाला?

नवी दिल्ली : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. मोदींनी बूस्टर डोस देण्यात येणार अशी घोषणा केली असली, तरी डोसचा प्रिकॉशन डोस असा उल्लेख केला आहे. मोदींनी त्यांच्या भाषणात बूस्टर असा शब्द वापरला नाही. त्याऐवजी प्रतिबंधात्मक डोस असे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, आता 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि सहव्याधी असणार्‍या आणि साठीपार केलेल्या ज्येष्ठांनाही प्रतिबंधात्मक डोस दिला जाणार आहे. लहान मुलांसाठीची लसीकरण मोहीम नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरू होणार असून प्रतिबंधात्मक डोस 10 जानेवारीपासून द्यायला सुरुवात होणार आहे. सहव्याधी असलेले पण वयाची साठीपार केलेल्या ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक डोस घेता येईल. देशात लवकरच नाकावाटे घेतली जाणारी आणि जगातील पहिली ‘डीएनए’ लस द्यायलाही सुरुवात होणार आहे, असेही मोदींनी या वेळी जाहीर केले.

– महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण; देशातील 17 राज्यांत प्रादुर्भाव

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. देशातील 17 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वांत जास्त 108 रुग्ण आहेत. त्यापैकी 42 रुग्ण आतापर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत 79 असून त्यापैकी 23 जण बरे झाले आहेत. गुजरातमध्ये 43 रुग्ण असून त्यापैकी 10 जण बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये 41, तामिळनाडूमध्ये 38, केरळमध्ये 34, कर्नाटकमध्ये 31 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात येत आहे. ही घट केवळ नवीन आढळणार्‍या रुग्णांचीच नाही तर सक्रिय रुग्णसंख्येतही झाली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply