जग संघटीत होते आहे, याचा अर्थ व्यापारउद्योगही संघटीत होत आहेत. त्याला गती देण्याचे काम तंत्रज्ञान करते आहे. जगभर होत असलेले संपत्तीचे केंद्रीकरण हा त्याचा अपरिहार्य भाग आहे. गेल्या चार वर्षांत ते इतके वेगवान आणि सर्वव्यापी झाले आहे की त्याला आपण नाकारू शकत नाही आणि मनापासून स्वीकारूही शकत नाही. अशा या कालखंडात सरकार नावाच्या व्यवस्थेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
सध्याच्या अभूतपूर्व संकटामुळे चित्रपटांची निर्मिती आणि वितरण बंद आहे. तसेच चित्रपटगृहही बंद आहेत. चित्रपट व्यवसायात गेली काही वर्षे झालेला एक मोठा बदल असा की पूर्वी चित्रपट प्रदर्शित होत आणि तो चांगला असेल तर अनेक महिने त्याचा मुक्काम त्या थियेटरमध्ये पडलेला असे. पुढे चित्रपटगृहांची संख्या तर वाढलीच, पण चित्रपटांची संख्याही वाढली. भारतात दरवर्षी जगात सर्वाधिक म्हणजे सुमारे एक हजार चित्रपटांची निर्मिती अगदी गेल्या सहा महिन्यांपूर्वी होत असे. तर, तो बदल असा की, आता कितीही चांगला चित्रपट असला तरी तो शहरात एक महिनाही टिकत नाही. याचा अर्थ आता चित्रपट चांगले निर्माण होत नाहीत, असा नसून नवा चित्रपट देशातील हजारो चित्रपटगृहांत एकाच वेळी लागतो आणि त्याचे लाखो शो एका आठवड्यात होतात. त्यामुळे पूर्वी सहा महिने चालणार्या चित्रपटापेक्षा आता एक आठवडा चालणारा चित्रपट कितीतरी अधिक कमाई करून देतो! आता चित्रपटाची रिळे येत नाहीत, तर त्यांचे डिजिटल प्रक्षेपण होते किंवा डिजिटल हक्क विकत घेतले जातात. त्यामुळे तेही काम अतिशय वेगाने होते.
या बदलात काय काय होते आहे, ते पहा. पहिले म्हणजे, व्यवसायात टाकलेला पैसा एका आठवड्यात दामदुप्पट वसूल होतो किंवा बुडतो. दुसरे, त्याचे वितरण डिजिटल होत असल्याने रिळे आणण्यानेण्याचा खर्च आणि वेळ वाचला. तिसरे, निर्मितीचे तंत्रज्ञानही बदलल्यामुळे निर्मितीही अतिशय वेगवान झाली. एकाच अभिनेत्याचे एका वर्षात चार पाच चित्रपट येतात, याचा अर्थ ते काम किती वेगाने होत असेल, याची कल्पना करा. तात्पर्य, चित्रपट उद्योग वेगवान झाला, अत्याधुनिक झाला हे जेवढे खरे आहे, तेवढेच ते काम कमी मनुष्यबळात, कमी श्रमात होऊ लागले आहे. याचा वेगळा अर्थ असा की, त्यापासून मिळणारा पैसा हा अधिक भांडवल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या अतिशय मोजक्या व्यावसायिकांच्या खिशात जाऊ लागला आहे. याला म्हणतात, तो व्यवसाय संघटीत होणे. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील असे सर्व व्यवसाय वेगाने संघटीत होत असून त्याचे संपत्ती वितरणावर कसे परिणाम होत आहेत, यासंबंधीची विस्मयकारक माहिती अलीकडेच बाहेर आली आहे. जगातील हे वळण चांगले की वाईट, हे ठरविण्याआधी नेमके काय होते आहे, हे समजून घेऊ.
संपत्ती केंद्रीकरणाची 10 उदाहरणे
जग संघटीत होते आहे आणि संपत्तीचे केंद्रीकरण होते आहे, म्हणजे काय होते आहे, याची गेल्या वर्षातील काही ठळक उदाहरणे अशी आहेत. 1. अमेझॉनचे मालक जे बीझॉस यांची संपत्ती यावर्षी 63.6 अब्ज डॉलर (सुमारे साडेचार लाख कोटी रुपये) इतकी वाढली. एका दिवसात 13 अब्ज डॉलर (सुमारे 90 हजार कोटी रुपये) इतकी या कंपनीची कमाई झाल्याचेही उदाहरण आहे. 2. फेसबुकचे मालक मार्क झुबेनबर्ग यांची संपत्ती एका वर्षात 9.1 अब्ज डॉलरने (सुमारे 62 हजार कोटी रुपये) वाढली. 3. जगातील पहिल्या 500 श्रीमंत नागरिकांची संपत्ती 2016 मध्ये 751 अब्ज डॉलर होती, ती अवघ्या चार वर्षात दुप्पट म्हणजे 1.4 ट्रीलीयन डॉलर म्हणजे भारताच्या जीडीपीच्या निम्मी झाली. 4. जगातील सर्वाधिक श्रीमंत नागरिकांमधील सात जणांची संपत्ती वाढण्यामागे त्यांनी वापरलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वाटा आहे, या सात जणांची संपत्ती 666 अब्ज डॉलर असून या एका वर्षात तीत 147 अब्ज डॉलरची भर पडली आहे. 5. इलेक्ट्रिक कार आणि बॅटरींच्या उत्पादनात जगात आघाडीवर असलेल्या इलॉन मस्कची संपत्ती तर एका वर्षात दुप्पट म्हणजे 69.7 अब्ज डॉलर झाली आहे. त्यांच्या टेस्ला कंपनीने एका वर्षात 10 लाख इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती केली आहे. 6. भारतातील सर्वात मोठी कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांची कंपनी याच वर्षी अगदी अलीकडे 12 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली पहिली भारतीय कंपनी ठरली असून त्यामुळे अंबानी श्रीमंतांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर गेले आहेत. या कंपनीच्या संपत्तीतील वाढ ही प्रामुख्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानातील शिरकावामुळे झाली आहे. 7. पहिल्या 10 श्रीमंतांच्या यादीत असलेल्या दोघांची संपत्ती या वर्षी कमी झाली असून ते दोघेही तंत्रज्ञान कंपनीशी संबधित नाहीत. (बर्नार्ड अर्नोट आणि वॉरेन बफेट) 8. संपत्तीत मोठी वाढ किंवा घट होण्यासाठी पूर्वी काही वर्षे जात होती, हा बदल आता काही महिन्यांमध्ये होतो आहे. 9. चार वर्षांपूर्वी म्हणजे 2016 ला जे जगातील पहिले 10 श्रीमंत नागरिक होते, त्यातील चार श्रीमंत तंत्रज्ञानाशी संबधित कंपन्यांचे मालक होते. (संपत्ती 260 अब्ज डॉलर) पण पुढील चार वर्षांत तंत्रज्ञानाशी संबधित कंपन्यांच्या मालकांची संख्या सात वर गेली. (संपत्ती 666 अब्ज डॉलर) 10. अॅपल, अमेझॉन, अल्फाबेट (गुगल), फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट या आता केवळ अमेरिकन कंपन्या राहिल्या नसून त्या जागतिक कंपन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे बाजारमूल्य आता अमेरिकेच्या जीडीपीच्या 30 टक्के झाले आहे. जे 2018 च्या अखेरीस जीडीपीच्या 15 टक्के होते. यावरून त्यांच्या संपत्ती वाढीचा वेग लक्षात येतो.
अमेरिकेपेक्षा भारतात अधिक ग्राहक
संपत्तीचे असे हे केंद्रीकरण जसे जगात होते आहे, तसेच ते भारतातही होते आहे, याचे भान आता ठेवावे लागेल. कारण या कंपन्यांचे जेवढे ग्राहक अमेरिकेत आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त ग्राहक भारतात आहेत. सध्या भारतातील दरडोई वापर कमी असला तरी तोही नजीकच्या भविष्यकाळात वाढणार आहे. त्याचे सर्वात जवळचे उदाहरण म्हणजे फेसबुक आणि फेसबुकच मालक असलेले व्हॉटसअॅप होय. या दोन्हीचा भारतातील वापर प्रत्येकी 35 कोटींच्या घरात गेला आहे. अमेरिकेत फेसबुक 22 कोटी आणि व्हाटसअप सात कोटी नागरिक वापरतात. याचा अर्थ या कंपनीचे अमेरिकेपेक्षा भारतात अधिक ग्राहक आहेत. फेसबुक रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जीओ मध्ये गुंतवणूक का करते, हे यावरून लक्षात येते. फेसबुकवर येणार्या भारतीय जाहिरातींचे वाढते प्रमाण पाहिले की फेसबुक भारतातही कसा पैसा कमावते आहे, याचा अंदाज येतो. याचा अर्थ वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, रेडीओ आणि शहरात रस्त्यावर करण्यात येणार्या जाहिराती पुढील काळात कदाचित फेसबुकवर दिसू लागतील. फेसबुकची केवळ राज्यवारच नव्हे तर विशिष्ट शहरे केंद्रित कार्यालये सुरु होतील. याला म्हणतात व्यवसाय संघटीत होणे आणि संपत्तीचे केंद्रीकरण.
सरकारची भूमिका महत्वाची ठरणार
आता मुद्दा असा उपस्थित होतो की, आपल्याला हे मान्य नसेल तर आपण हे टाळू शकतो का? या प्रश्नाचे भावनिक उत्तर आहे, आपण हे टाळू शकतो. आणि व्यावहारिक उत्तर आहे, आपण हे टाळू शकत नाही. जगात होत असलेल्या संपत्तीच्या केंद्रीकरणाचा वेग किती वाढतो आहे, याची उदाहरणे आपण पाहिली. या केंद्रीकरणाचे साधन आहे तंत्रज्ञान. ज्याला आज कोणीच नाकारू शकत नाही. उलट ते स्वीकारण्याची शर्यत लागली आहे. कारण त्यावरच आपले दैनंदिन जीवन अवलंबून आहे. किमान कोरोना संकटाच्या काळात तरी आपल्याला हे मान्यच करावे लागणार आहे की ऑनलाइन हा आपल्या आयुष्यातील परवलीचा शब्द झाला आहे. आता जेव्हाकेव्हा हे संकट दूर होईल, तेव्हा ऑनलाइनच्या सवयी तशाच राहतील. याचा अर्थ आपण ज्या कंपन्यांची चर्चा केली, त्यांचे आपण कायमस्वरूपी ग्राहक झालेलो असू! संपत्तीच्या या केंद्रीकरणात आपलाही वाटा आहे, हे सहजासहजी लक्षात येत नाही. पण ते आज आपण नाकारूही शकत नाही. काही वर्षापूर्वीचा चांगले चित्रपट महिनोन्महिने चालण्याचा काळच मागे पडला नव्हे, त्यावेळच्या जगण्यातील रोमान्सलाही आपण हरवून बसलो आहोत, असेही आपण सध्या म्हणत आहोत. पण त्यासाठी जीवनाचा वेग कमी करायला आपण तयार आहोत काय? या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत नकारार्थी आहे, तोपर्यत संपत्तीचे केंद्रीकरण अपरिहार्य आहे. अशा प्रसंगी, त्यात भाग घ्यायचा की त्याच्याशी फटकून राहायचे, हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे! अशा या कालखंडात सरकार नावाच्या व्यवस्थेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. समाजाची घडी विस्कटणार नाही आणि सर्वांच्या वाट्याला मानवी प्रतिष्ठेचे जीवन येईल, अशा व्यवस्थेचा शोध जगातील सरकारांना नजीकच्या भविष्यात घ्यावा लागेल.
(अशी व्यवस्था कशी असू शकेल, याचे प्रारूप अर्थक्रांतीने चार प्रस्तावाच्या मार्गाने तयार केले आहे. ते विचारार्थ सरकारसह अनेक व्यासपीठांवर ठेवले गेले आहे.)
असे आहे भारतातीलही संपत्ती केंद्रीकरण
* केवळ10 कंपन्यांनी केली 140 देशांच्या जीडीपीवर मात!
एकीकडेकोरोनामुळे भारताच्या आर्थिक स्थितीविषयीचिंता व्यक्त केली जात असताना भारतीय शेअर बाजार वाढतोच आहे. अर्थात, काही कंपन्यांच्या विक्रीवर या काळातही फार विपरीत परिणाम झालेला नाही, हे त्याचे कारण आहे. काही कंपन्यांची विक्री तर चांगलीच वाढली आहे. शिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेवर परकीय आणि देशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत चालल्याने तेअशा संकटातही गुंतवणूक करत आहेत. याचा दुसरा अर्थ आर्थिक विषमतेचा मुद्दा भारतातही त्याच प्रमाणात दिसू लागला आहे.
मार्चपासून शेअर बाजार 50 टक्के वधारला आहे,त्यातील 10 प्रमुख कंपन्यांचे बाजारमूल्य 17.76 लाख कोटी रुपये म्हणजे सुमारे 237 अब्ज डॉलरने वाढले आहे.(एकाडॉलरचाशुक्रवारचा दर 74.8 रुपयेधरून) ही रक्कम पुढील प्रमुख देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. न्यूझीलॅड – 204, पोर्तुगाल – 236, पेरू – 228, इराक – 224, ग्रीस – 214(सर्व आकडे अब्ज डॉलर) याच्या खाली असे 136 देश आहेत.
गेल्या 24 मार्च रोजी भारतीय शेअर बाजारातील सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य 103 लाख कोटी रुपये इतके होते, ते आज 148 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. म्हणजे या तीन महिन्यात त्यात 45 लाख कोटी रुपये इतकी प्रचंड वाढ झाली आहे. ज्या मोठ्या कंपन्यांचे मूल्य याकाळात वाढले, त्या अशा – रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, विप्रो, एचसीएल,एचडीएफसी.(10 तील सात तंत्रज्ञान क्षेत्रातील)
भारतातील काळा पैसा स्वीस बँकांत जातो आणि त्यातील बहुतांश बँका स्वित्झर्लंडमध्ये आहेत. स्वित्झर्लंड एक जगातील श्रीमंत देश मानला जातो, त्याचा समावेश सर्वात अधिक जीडीपी असलेल्या पहिल्या 20 देशांत होतो. आश्चर्य म्हणजेभारतातील पहिल्या 10 कंपन्यांचे बाजारमूल्य (669अब्ज डॉलर) स्वित्झर्लंडच्या जीडीपीच्या(715 अब्ज डॉलर) आकड्याला लवकरच स्पर्श करू शकते ! जीडीपीत एकविसाव्या क्रमांकावर असलेल्या पोलंडला (665 अब्ज डॉलर) या कंपन्यांनी मागे टाकले आहे. याचा अर्थ जीडीपीच्या निकषांत पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारतातील 10 कंपन्यांचा कारभार 140 देशांपेक्षाअधिक आहे तर !
– यमाजी मालकर
ymalkar@gmail.com