Breaking News

लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषणा होणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खारघरच्या सभेत ग्वाही

पनवेल : रामप्रहर वृत्त
डिसेंबरअखेरीस पनवेलमधील विमानतळाचे काम पूर्ण होईल आणि जेव्हा विमान येथून उडेल व येथे उतरेल त्या वेळी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री, बुलंद तोफ देवेंद्र फडणवीस यांनी खारघर येथे सोमवारी (दि.6) भव्य जाहीर सभेत दिली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर झाली. त्या वेळी ते बोलत होते.
सभेला व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, चिटणीस शिवदास कांबळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, महानगरप्रमुख योगेश चिले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, अतुल पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, दीपक बेहेरे, चारुशिला घरत, उपाध्यक्ष प्रिया मुकादम, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, भाजपचे खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे, माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अल्पसंख्याक समाजाचे जिल्हाध्यक्ष मन्सूर पटेल, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, मनीषा ठाकूर, कुंदा गोळे आदी उपस्थित होते. या सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 1990मध्ये विमानतळ होणार स्वप्न पहिले होते, पण प्रत्यक्षात विमानतळ साकारण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. मेट्रो, विमानतळाच्या कामाचा पाठपुरावा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आणि त्यांना खासदार श्रीरंग बारणे यांची साथ मिळाली. भूमिपुत्रांना सोबत घेऊन येथील चित्र विकासात बदलण्याचे काम झाले असून अटल सेतूमुळे मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हीटी वाढणार आहे आणि त्यामुळे हा परिसर आर्थिक राजधानी होणार आहे. पनवेल व आजूबाजूच्या परिसरात विकास करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असल्याचे सांगतानाच येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम असतो. पनवेल महापालिकेला पाण्याची अमृत योजना असू द्या किंवा जीएसटीचा परतावा मिळवून द्यायचा याचे श्रेय मला ते देत असले तरी खरे श्रेय त्यांचे आहे. दरवर्षी 72 कोटी रुपये जीएसटीऐवजी आता 400 कोटी रुपये जीएसटी परतावा त्यांच्याच पाठपुराव्यातून शक्य झाला आहे. पनवेल परिसरात जास्तीत जास्त विकासकामे करून घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असतो, असेही त्यांनी या वेळी अधोरेखित केले.
या परिसरात विमानतळ, मेट्रो तसेच इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्या अनुषंगाने परिसराचा विकास झाला पाहिजे यासाठीही नेहमी आमदार प्रशांत ठाकूर यांचा आग्रह राहिला आहे. आमदार प्रशांत ठाकूर कार्यसम्राट आहेत व त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या मतांचा रेकॉर्ड पनवेल तोडणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला. ही देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. त्यामुळे देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो, तर तो फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच. पूर्वी देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर दरवर्षी एक लाख कोटी रुपये खर्च केले जायचे, पण मोदीजी सरकार आल्यावर दरवर्षी 13 लाख कोटी रुपये खर्च करून प्रकल्प, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला. त्यामुळेच आपला देश मोठ्या प्रमाणात विकास करू शकला, असेही त्यांनी सांगितले. शेतकरी, मच्छीमार, कामगार यांचा विचार मोदीजींनी केला असे सांगतानाच विश्वकर्मा योजनेतून बारा बलुतेदारांचा विचारही त्यांनी केला आणि आपल्या देशाच्या इतिहास पहिल्यांदाच असे घडले आहे, असे त्यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटले की, खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम शिंदेंनी केले आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असतील, पण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार नाहीत, असा घणाघात त्यांनी केला. महायुतीच्या मेट्रोला नरेंद्र मोदी नावाचे इंजिन आहे. त्यामुळे त्यामागे कितीही बोगी जोडल्या जाऊ शकतात. इंडिया आघाडीतील सगळेच स्वतः इंजिन असल्याचे सांगतात. प्रत्येकजण बोगी स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांचे इंजिन हलतही नाही आणि डुलतही नाही. इंडिया आघाडीच्या इंजिनला डब्बेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या इंजिनमध्ये फक्त घरातलीच माणसे बसू शकतात. राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे बसतील. त्यामुळे त्यांच्याकडे सामान्य माणसाला जागा नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेट्रोत देशातील तळागाळातील घटकांसाठी जागा आहेत. सबका साथ सबका विश्वास या अनुषंगाने मोदीजी काम करीत आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडी म्हणजे 24 पक्षांची खिचडी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वैश्विक नेतृत्व आहे. भारतात मोदीजींमुळे लस तयार झाली आणि आपल्या देशासोबत जगालाही संजीवनी मिळाली. त्यामुळे जगातील 100 देश भारताच्या पाठीशी आहेत, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
काँग्रेस सरकार असताना बॉम्बस्फोट झाल्यावर फक्त पाकिस्तानचा निषेध करायचे, पण मोदीजी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केले गेले आणि आता पाकिस्तानची हिंमतही होत नाही. भारत चांद्रयान पाठवतो आणि तिकडे पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन उभा आहे. यातूनच नेतृत्व सिद्ध होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपला हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांना लोकसभेत पुन्हा पाठवा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केले.

आमचे मुद्दे विकासात्मक -खासदार श्रीरंग बारणे
या वेळी उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलताना गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना मतदारसंघात अनेक कामे केल्याची माहिती दिली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश महासत्तेकडे वाटचाल करीत असून विकासात्मक मुद्दे घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहचत आहोत, तर विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते फक्त टीकात्मक मुद्दे घेऊन फिरत आहेत. दहा वर्षे मला प्रेम दिले. यापुढेही द्या आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मला लोकसभेत काम करण्याची संधी द्या, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले. पनवेलमधील विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करताना पनवेलच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत आहे, असे नमूद करून पनवेल महापालिकेसंदर्भातील शास्ती कर माफ करावा, अशी मागणीही या वेळी केली.

संपूर्ण देशात विकासाचे पर्व -आमदार प्रशांत ठाकूर
आपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची ग्वाही दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले काम विश्वासात बदलले आणि हा विश्वास गॅरेंटीमध्ये बदलला. संपूर्ण देशामध्ये विकासाचे पर्व निर्माण झाले आहे. विमानतळाचे काम लवकर पूर्ण होऊन या ठिकाणी हजारोंच्या संख्येने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला लागले पाहिजे ही सर्व भूमिपुत्रांची, प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे आणि त्याला आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल मी आभार मानतो. अटल सेतू पूर्ण झाला. आता उरण ते चौक 3200 कोटींचा महामार्ग तयार होऊन या परिसराचा संपर्क अधिक वाढणार आहे. पनवेल महापालिकेला अमृत योजना मिळाली, न्हावा शेवा टप्पा 3मधून दरदिवशी 150 एमएलडी पाणी मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. येथील विजेच्या संदर्भात सुविधांसाठी 480 कोटींचा निधी, जीएसटीचा परतावा अशी अनेक कामे देवेंद्रजी यांनी करीत पनवेलच्या विकासाला चालना दिली आहे, असेही त्यांनी नमूद केले. महानगरपालिकेचा टॅक्स भरू नका, टॅक्स माफ करून देतो अशा वल्गना काही लोकांनी केल्या. नागरिकांना टॅक्स भरू दिला नाही. त्यामुळे महापालिकने मालमत्ताधारकांना नोटीस पाठवल्या आणि शास्ती लागल्या. वल्गना करणार्‍यांचे ते स्वार्थी राजकारण होते, पण डबल टॅक्सेस रद्द करा, अशी आमची मागणी असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी आपल्या मागणीतून अधोरेखित केले.

सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दहा वर्षात अनेक निर्णय, योजना राबवल्या. भाजपने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. उलट देशातील प्रत्येक समाजाच्या उन्नतीसाठी पक्ष काम करीत आहे. देशाचा अधिकाधिक विकास करण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सज्ज राहूया आणि आपल्या मावळ लोकसभा मतदार संघातून खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा मताधिक्याने विजयी करूया.
-अविनाश कोळी, जिल्हाध्यक्ष, भाजप

अनेक कामे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहेत, मात्र विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, आणि दृष्टिकोनही नाही. त्यामुळे विरोधक फक्त आरडाओरड करत आहे. त्यांची मतलबी भूमिका जनतेला माहीत आहे.
-रामदास शेवाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आणि या अनुषंगाने काम करीत बाबासाहेबांनी दिलेली राज्य घटना समृद्ध करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ताकद, तर आमदार प्रशांत ठाकूर यांची जनशक्ती पाठीशी आहे. त्यामुळे खासदार श्रीरंग आप्पा बारणे प्रचंड मतांनी विजयी होतील.
-शिवदास कांबळे, प्रदेश चिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस

खासदार आप्पा बारणे यांनी केलेल्या कामाचा धडाका सर्वांना माहिती आहे, मात्र विरोधक स्वतःच्या स्वार्थासाठी अप्रचार करीत आहे, पण सुज्ञ नागरिक त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.
-परेश पाटील, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांसाठी अनेक योजना अमलात आणल्या आणि त्यामुळे देशातील कन्या ते ज्येष्ठ महिलांना त्याचा लाभ होतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार ही काळाची गरज बनली आहे.
-चारुशीला घरत, जिल्हा सरचिटणीस, भाजप

जेव्हापासून मुख्यमंत्रीपद गेले तेव्हापासून उध्दव ठाकरे रडके झाले आहेत. बाळासाहेबांच्या तत्वांना मूठमाती देऊन काँग्रेसच्या मांडीवर बसण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे खर्‍या शिवसेनेने त्यांना पक्षातून हाकलून दिले आहे.
-योगेश चिले, महानगरप्रमुख, मनसे,

भाजप जातीयवादी नाही, तर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी काम करणारा पक्ष आहे. संविधानाचा सन्मान करण्याचे काम मोदी सरकारने केले. सत्ता आल्यावर अनुसूचित जातीचे रामनाथ कोविंद यांना व त्यानंतरच्या काळात आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करून तळागाळातील घटकांचा सन्मान केला आहे.
-अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, जिल्हा सरचिटणीस, भाजप

देशाची महती जगात उज्ज्वल करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसच्या काळात देशाच्या सीमा असुरक्षित होत्या, देश भयभीत होता, पण मोदी सरकार आल्यानंतर देशाच्या भविष्यासाठी मोदीजींनी पावले उचलली आणि अतिरेक्यांच्या कचाट्यातून मुक्त होत देश सुरक्षित झाला आहे.
-नरेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष, आरपीआय

सभेतील क्षणचित्रे
* भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खारघर येथे झालेल्या सभेला हजारो जणांची उपस्थिती. मोठ्या संख्येने महिलांची हजेरी.
* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या वर्षाच्या अखेरीस पहिले विमान उड्डाण घेताना लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करीत असल्याचे व उतरताना लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरत असल्याचीच घोषणा होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार ठाकूर यांचे कौतुक होताच जोरदार घोषणा व टाळ्यांचा कडकडाट.
* सुधागड एज्युकेशन शाळेत चौथीत शिकणारी यशस्वी बापूराव काळे ही मुलगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्यापूर्वी अबकी बार मोदी सरकार…, मोदी, मोदी.. अशा घोषणा मोठमोठ्याने देत होती. त्यामुळे उपस्थितांचे लक्ष तिच्याकडेच होते.
* आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलची पाणी योजना असो की महापालिकेचा जीएसटी असो त्याचा पाठपुरावा करीत असतात. त्यामुळेच येथील विकास होत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply