Breaking News

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा मराठा समाज म्हणून आम्हाला मान्य नाही -रामदास शेवाळे

समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका नाही!

पनवेल : रामप्रहर वृत्त
समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील काही मराठा समन्वयकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा समस्त मराठा समाजाला विश्वासात न घेता दिला असल्याने तो समाज म्हणून आम्हाला मान्य नाही, असे मराठा समाजाचे नेते रामदास शेवाळे यांनी मंगळवारी (दि. 7) पनवेल येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सकल मराठा समाजाच्या वतीने कुठलाही पाठिंबा राजकीय पक्षांना देण्यात आला नाही. समाजात कोणतीही दुफळी होऊ नये. त्यामुळे हा निर्णय आहे, मात्र काही लोकं स्वार्थापोटी असे करीत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे सकल मराठा समाज म्हणून दिलेला पाठिंबा मान्य नाही, असे स्पष्ट मत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मराठा समाजाच्या वतीने व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला मराठा समाजाचे बाळासाहेब पाटील, चंद्रकांत सावंत, दीपक पाटील, केदार भगत, समीर कदम, हर्षवर्धन पाटील, डॉ.प्रशांत कदम, सुभाष कदम, शिवाजी थोरवे, सचिन भगत, राजेंद्र भगत, विकास वारदे, प्रदीप देशमुख, तेजस जाधव, सोनल कदम, स्नेहल बागल, स्वरूपा सुर्वे, अ‍ॅड. प्रशांत भिलारे, कुमार भगत, सुमित दसवते, नितेश भगत, सत्यजित भगत, भावेश शिंदे, भरत जाधव, किरण नागरगोजे, अवधूत साळुंखे, रावसाहेब आभाळे, रघुनाथ काळे, अशोक जाधव, निलेश दिसले, गोरख नाईक आदींसह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी खोपोली येथे काही मोजक्याच मराठा समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी परस्पर कोणालाही विचारात न घेता सकल मराठा समाजाचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयाला मराठा समाजातीलच बांधवांनी विरोध केला आहे. या वेळी बोलताना रामदास शेवाळे यांनी, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणार्‍या मनोज जरांगे-पाटील यांनासुद्धा विश्वासात न घेता काही नेते कोणताही निर्णय घेत असतील, तर तो निर्णय समाज बांधवांसाठी घातक ठरण्याची जास्त शक्यता आहे आणि हजारो मराठा बांधवांनी या निर्णयाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. काही मोजक्या समन्वयकांनी घेतलेला निर्णय समस्त मराठा समाजाला न पटणारा आहे. निर्णय घेण्याआधी संपूर्ण मराठा समाजाची बैठक घेणे गरजेचे होते. महायुतीने जे काम मराठा आरक्षणासाठी केले आहे ते आधी कोणीच केले नाही. वाशी येथे झालेल्या विजयोत्सवात तसे स्पष्ट दिसत होते.
बाळासाहेब पाटील यांनी बोलताना, महायुतीने मराठा समाजासाठी जे काम केले आहे ते महाविकास आघाडीकडून तसूभरही झाले नाही. 10 टक्के आरक्षण महायुतीकडून देण्यात आले. कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे कामदेखील फक्त महायुतीकडून झाले. त्यामुळे लाखो समाज बांधवांना याचा लाभ होणार आहे. सगेसोयरे हा विषय लवकरच सोडवला जाईल अशी आशा असून कोर्टात आरक्षण टिकवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाने संभ्रमात न राहता देशासाठी आपल्याला मतदान करायचे आहे असे समजून मतदान करावे.
मराठा आरक्षण समन्वय समिती सरचिटणीस चंद्रकांत सावंत यांनी, सकल मराठा समाजात 400 समन्वयक आहेत. त्यातील काही जण मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत फोटो काढून स्वतःच जरांगे-पाटील असल्याचे भासवत आहेत. त्यामुळे अशांची भूमिका ही सकल मराठा समाजाची भूमिका आहे असे कोणी समजू नये, असे सांगत मराठा समाज कोणाच्या बाजूने आहे ते 4 जूनला समजेल, असे म्हटले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply