Monday , October 2 2023
Breaking News

शासकीय कर्माचार्‍यांना आता ड्रेस कोड

पनवेल : प्रतिनिधी
अय्या, काय मस्त आहे गं हे डिझाईन… कोठून घेतलास हा ड्रेस… किंवा मस्त आहे टी-शर्ट… केवढ्याला घेतलास?… हे शासकीय कार्यालयात ऐकू येणारे संवाद आता आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत. कारण महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांतील पुरुष कर्मचार्‍यांना कार्यालयात जीन्स व टी-शर्टला आणि महिलांनाही चित्रविचित्र पोशाख घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत 8 डिसेंबर रोजी परिपत्रक काढून ड्रेस कोडबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य शासन अंतर्गत मंत्रालय तसेच मंत्रालयाच्या अधिनिस्त सर्व प्रकारच्या राज्य शासकीय कार्यालयांतून राज्य शासनाचा कारभार चालवला जातो. या ठिकाणी खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिक आपल्या कामासाठी येत असतात. या वेळी संबंधित अधिकारी हे राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याजवळ सुसंवाद साधत असतात. अशा वेळी त्यांची वेशभूषा, केशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यावरून आस्थापनेची एक विशिष्ट छाप अभ्यांगतावर पडते. त्यामुळे शासकीय कर्माचार्‍यांनी त्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. यासाठी त्यांच्या दैनंदिन पेहरावाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.   यामध्ये कर्मचार्‍यांनी परिधान केलेला पेहराव व्यवस्थित असावा. महिला कर्मचार्‍यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, राऊझर पॅण्ट त्यावर कुर्ता किवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. पुरुष कर्मचार्‍यांनी  शर्ट व पॅण्ट/ राऊझर पॅण्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम व चित्र असलेले पेहराव करू नयेत. सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी जीन्स आणि टी-शर्टचा वापर कार्यालयात करू नये. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वीच्या परिपत्रकाप्रमाणे शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करावेत, असे सूचित करण्यात आले आहे. या सूचना कंत्राटी कर्मचारी आणि शासकीय सल्लागारांनाही लागू आहेत.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply