Breaking News

कर्मवीर अण्णांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सातारा : रामप्रहर वृत्त
आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात कर्मवीर अण्णा यांच्या 65व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस गुरुवारी (दि.9) विनम्र अभिवादन करण्यात आले. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाइस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे सचिव विकास देशमुख, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमन पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती शिवाजी कदम, जयश्रीताई चौगुले, मीनाताई जगधने, महेंद्र लाड, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, महेंद्र घरत, संजीव पाटील, जे.के. जाधव, राम गाडगे, राजेंद्र फाळके, ज्योत्स्ना ठाकूर आदी पदाधिकारी आणि रयतसेवक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. समाधीस्थळ, कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
या सोहळ्यात नूतनीकरण करण्यात आलेल्या कर्मवीर स्मृती भवनचे ऑनलाईन पद्धतीने खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले तसेच प्रथमच शैक्षणिक वर्षानुसार संपादित करण्यात आलेल्या कार्यदर्शिका, त्याचबरोबर संस्थेचा वार्षिक अहवाल, भौगोलिक नकाशा, रयत विज्ञान पत्रिका, संस्थेच्या विविध शाखांची माहिती असलेली पुस्तिका यांचेही प्रकाशन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले की, कर्मवीर अण्णांनी संस्थेची स्थापना संघर्षमय काळात केली. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता त्यामध्ये खूप बदल झाला आहे आणि हा बदल अंगिकारून संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे. दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येतात. सध्या एआय या परिवर्तन प्रणालीचे जग आहे. त्यामुळे त्याचाही वापर आवश्यक झाला आहे. रयतसेवक आणि कार्यकर्ता संस्थेचा ठेवा आहे आणि त्यांच्या सहकार्यातून ही संस्था वाटचाल करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. आजच्या दिवशी होणारा या वर्षीचा गुणगौरव समारंभ आचारसंहिता असल्याने घेता आला नाही, मात्र आचारसंहिता संपल्यावर हा कार्यक्रम घेऊन गुणीजणांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, तर संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या पुढील काळातील धोरणाची आखणी मांडली. सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply