शिवसेना नेते अब्दुल सत्तार मंत्रिपदावरून नाराज
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्या राज्यमंत्रिपदाच्या राजीनामा वृत्ताने शनिवार (दि. 4)चा दिवस गाजला. खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांचा हा पवित्रा शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारसाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मी राजीनामा दिला नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर देणार असल्याचे सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, तर तिसरीकडे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांच्यावर टीका केली आहे.
अब्दुल सत्तार मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासूनच नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र ऐनवेळी त्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितले. दुय्यम दर्जा दिल्याने ते अस्वस्थ होते. त्यातच जिल्हा परिषदेतील सत्ता काँग्रेसच्या हाती देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने सत्तार संतापले आणि त्यातूनच त्यांनी राज्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्त शनिवारी थडकले.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 18 सदस्य आहेत, तर काँग्रेसचे 10 सदस्य असताना काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. हा निर्णय घेताना शिवसेनेने सत्तार यांना विश्वासात घेतले नव्हते. हेसुद्धा त्यांच्या राजीनाम्यामागचे कारण असू शकते, असे सूत्रांनी सांगितले. शिवाय जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करीत असतात. मला विचारात घेत नाहीत. ज्या पक्षातून आलो त्याच पक्षाच्या लोकांना पायघड्या अंथरल्या जात असतील, तर मंत्रिपदी राहण्यात काय उपयोग, असा सवाल सत्तार यांनी केल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper