Breaking News

गुळसुंदेतील पाणीसमस्या अधिवेशनात

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई निर्माण झाली असून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गुळसुंदे परिसरातील या पाणीसमस्येवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
आपल्या प्रश्नामध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी नमूद केले आहे की, गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनवाडी, फलाटवाडी, चिंचेचीवाडी या आदिवासी वाड्यांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे ऑक्टोबर 2021मध्ये निदर्शनास आले आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या 52 वर्षे जुन्या नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणतीही जलशुद्धीकरण प्रक्रिया न करता आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त अर्धा तास या गावांना पाणीपुरवठा होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे संबंधित ठिकाणी अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी केली? चौकशीच्या अनुषंगाने नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय? असे सवाल आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले आहेत.
यावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाड्यांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे, तसेच गेल्या 10 ते 12 वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या 52 वर्षे जुन्या नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणतीही जलशुद्धीकरण प्रक्रिया न करता आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त अर्धा तास या गावांना पाणीपुरवठा होत असल्याचे अंशतः खरे आहे. दररोज टीसीएल व अ‍ॅलमची प्रक्रिया करून जलशुद्धीकरण केंद्रातून गुळसुंदे हद्दीतील गावे व वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply