कर्जत : प्रतिनिधी
कर्जत नगर परिषद क्षेत्रातील वाहतूक समस्या वाढत होती. ती सोडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने सुरू केलेली टोईंग व्हॅन तांत्रिक बाबीमुळे बंद पडली होती. अखेर आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा बुधवार (दि. 1)पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही, कशीही गाडी पार्क करणार्यांनो सावध व्हा, आपल्यावर कारवाई होऊ शकते.
कर्जत शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रूंद केलेले रस्ते कुणासाठी बांधलेत हासुद्धा एक संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्याला फेरीवाले व हातगाडीवाल्यांचा विळखा बसला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसते. त्यातच सकाळच्या वेळी चाकरमान्यांना, विद्यार्थ्यांना, व्यवसायिकांना, तसेच प्रवाशांना गाड्या पकडण्यासाठी कसरत करावी लागते, मात्र रात्री बाजारपेठेतील रस्ता मोठा दिसतो आणि दिवस उजाडला की रस्ता भरगच्च असतो. मध्यंतरी टोईंग व्हॅन सुरू केली आणि वाहतुकीचा प्रश्न चांगल्याप्रकारे सुटू लागला, मात्र काही तांत्रिक बाबींमुळे ही टोईंग व्हॅन बंद करण्यात आली. याबाबत उपविभागीय पोलीस कार्यालय व नगर परिषद यांना विचारणा केली असता दोन्ही कार्यालयांनी आपापली जबाबदारी एकमेकांवर झटकली होती. त्यामुळे कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधांतरीच राहिला होता.
कर्जत शहरातील वाहतूक समस्या सर्वांचीच डोकेदुखी होऊन बसली आहे. पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी आल्यानंतर किंवा नगर परिषदेची सूत्रे नवीन मुख्याधिकार्याने स्वीकारल्यानंतर काही दिवस कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली राहते, मात्र नंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती होऊन बसते. मध्यंतरी टोईंग व्हॅन आणून वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या उपक्रमाचे स्वागत कर्जतकरांनी केले. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी सुस्कारा सोडला होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे टोईंग व्हॅन बंद करावी लागली आणि शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे हाताबाहेर गेली होती. आज प्रत्येक ठिकाणी मनात येईल तशी टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांची पार्किंग होत आहे. टोईंग व्हॅन बंद असल्याने तिचा दरारा राहिला नाही.
वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस अडचणीचा ठरत चालला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि नगर परिषद कार्यालयाकडे टोईंग व्हॅन बंद का केली? ती लवकर सुरू करा, अशी मागणी केली असता उपविभागीय पोलीस कार्यालयाकडून यापूर्वी कर्जत नगर परिषदेने टोईंग व्हॅनची योजना आखली होती. त्याद्वारे मिळणारा महसूल नगर परिषद वसूल करून घेत होती. फक्त त्यावर देखरेखीकरिता टोईंग नियमन व मोटर केसेस कारवाई पोलीस विभाग करीत होते. याबाबत नगर परिषदेकडे पाठपुरावा करावा, असे सूचित करून नगर परिषदेकडे बोट दाखविले होते. अधिकृत पार्किंग कारवाईची बाब पोलीस विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने टोईंग व्हॅनची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. नगर परिषदेने पार्किंगबाबत जागा निश्चित केल्या आहेत, असे उत्तर देऊन हात झटकले होते.
एकंदरीत या दोन्ही कार्यालयांनी टोईंग व्हॅनबाबत आपापली जबाबदारी झटकून टाकली असल्याने कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्था किती दिवस अशीच राहणार? अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त होत होती. अखेर पंकज ओसवाल यांनी आपले सरकार यावर याविषयी तक्रार दाखल केली होती. आपले सरकार यावर ओसवाल यांनी पाच तक्रार अर्ज दाखल केले आहेत. पंकज ओसवाल यांच्या अर्जावर जिल्हा वाहतूक शाखा अलिबाग यांचे पत्र आले. त्या पत्रात नगर परिषदेकडून टोईंग व्हॅन उपलब्ध होताच टोईंग व्हॅनवर पोलीस कर्मचारी पुरविण्याची नियोजित कारवाई कार्यालयाकडून होईल, असे कळविण्यात आले. दरम्यानच्या काळात नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नव्याने आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची या विषयावर संयुक्त बैठक झाली. त्याबाबत टोईंग व्हॅन सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला आणि आज दि. 1 मे कामगार दिन या दिवसापासून आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा टोईंग व्हॅन सुरू करण्यात आली आहे.