Breaking News

एमपीएसची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

मुंबई ः प्रतिनिधी

येत्या 2 जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या निर्णयासोबत ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार याची तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांचे नियोजन पुन्हा एकदा बिघडले आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे मंगळवारी (दि. 28) या संदर्भातील परिपत्रक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले आहे. राज्य सेवा पूर्वपरीक्षा 2021करिता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी यासाठी दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या ट्वीटसोबत आयोगाने परिपत्रकदेखील जारी केले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाकडून निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत 2 जानेवारी रोजी होणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे, तसेच परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही यात म्हटले आहे. यानिमित्ताने परीक्षांमधील गोंधळाची परंपरा कायम असल्याचे समोर आले आहे. याआधी राज्य सरकारने अनेक परीक्षांच्या तारखा बदलल्याचा इतिहास ताजा आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply