Breaking News

महिला सरपंचाच्या खुनाचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

महाड ः प्रतिनिधी

महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या महिला सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांचा मृतदेह सोमवारी दुपारी संशयास्पद अवस्थेत आढळल्याने पोलीस तपास यंत्रणा कामाला लागली आहे. या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. आदिस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी खिडबीडे सोमवारी सकाळी सरपणाची लाकडे गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह विवस्त्रावस्थेत दिसून आला. या घटनेने संपूर्ण महाड तालुका हादरला आहे. मयत मीनाक्षी खिडबिडे यांचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता, मात्र दुसर्‍या दिवशी हा मृतदेह मुंबई येथे न्यायवैद्यक तपासणीकरिता नेण्यात आला आहे. मयत खिडबिडे यांच्यावर हत्येपूर्वी अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे खुनी कोण आणि खुनाचे कारण काय हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. या खुनाच्या तपासाकरिता अलिबाग येथून श्वानपथक दाखल झाले. याशिवाय मृतदेहाजवळ पडलेल्या लाकडांवरील बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत. या हत्येप्रकरणी महाड तालुका पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भा.दं.वि. कलम 302, 376, 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मयत मीनाक्षी खिडबिडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे या खुनामागे राजकीय वाद आहे का, याचाही मागोवा पोलिसांना घ्यावा लागणार आहे. या संपूर्ण घटनेसंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply