महाड : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणताही विचार न करता जनतेवर लादलेल्या अन्यायकारक लॉकडाऊन विरोधात महाड भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 8) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील छोटे व्यावसायीक आणि व्यापार्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन अन्यायकारक असून, त्यामुळे गरीबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तसेच केवळ विकेंडला अर्थात शनिवारी, रविवारी लॉकडाऊन केले जाईल व इतर दिवशी कडक निर्बंध लावले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात संपूर्ण लॉकडाऊन करुन या आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. यामुळे मजूर, छोटे व्यावसायीक, व्यापारी देशोधडीला लागणार आहेत. या विरोधात भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर आणि तालुकाध्यक्ष जयंत दळवी यांच्या नेतृत्वाखाली महाड भाजप रस्त्यावर उतरली आहे. गुरुवारी सकाळी शहरातील राममंदिर चवदार तळे येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत सर्वसामान्यांनी राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त करीत सहभाग घेतला.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, संदिप ठोंबरे, चंद्रजित पालांडे, नाना पोरे, अक्षदा ताडफळे, निलेश तळवटकर, प्रभाकर झांजे, योगेश झांजे, अप्पा सोंडकर, सुमीत पवार, तुषार महाजन, दिनेश अंबावले उपस्थित होते. त्या नंतर हे सह्यांचे निवेदन प्रांताधिकार्यांना देण्यात आले.