पनवेल : रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांमध्ये ग्राहकांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने, मंगळवारी (दि. 15)जागतिक ग्राहक दिनाच्या औचित्याने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) च्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स असोसिएशन आणि उपनियंत्रक वैधमापनशास्त्र यंत्रणा रायगड, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र पार पडले.
या चर्चासत्रास कोकण परिक्षेत्राचे वैधमापन यंत्रणेचे सहनियंत्रक डॉ. ललित हारोडे, निवृत्त उपनियंत्रक वैधमापन शास्त्र यंत्रणा सतिश पवार यांनी मार्गदर्शन केले. तर वैधमापनशास्त्र यंत्रणेचे निरीक्षक हेमंत कुलते, प्रकाश महानवार, एस. आर. देवकते यांची प्रमुख उपस्थितीसह महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, व्यवस्थापकीय अध्ययन विभागाचे प्रा. कुशलकुमार कुराणी, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. आकाश पाटील, आर्ट्स असोसिएशनच्या प्रमुख डॉ. गीतिका तन्वर, कॉमर्स असोसिएशनच्या प्रमुख प्रा. भक्ती बाटविया, सायन्स असोसिएशनच्या प्रमुख प्रा. प्रतिभा जाधव उपस्थित होते.
प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ.एस. के. पाटील यांनी, ग्राहकांच्या हक्कांविषयी भाष्य करीत महाविद्यालयाच्या कीर्तीचा मागोवा घेतला. त्यानंतर वाणिज्य विभागाच्या प्रा. प्रीती मोहिते यांनी, ग्राहक म्हणजे काय ते स्पष्ट करून ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 आणि 2019 च्या तरतुदी स्पष्ट केल्या. निवृत्त उपनियंत्रक सतिश पवार यांनी, जिल्हा ग्राहक संरक्षण मंच, राज्य ग्राहक संरक्षण मंच, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण मंच यांची संरचना समजावून सांगितली. कोकण परिक्षेत्राचे वैधमापन यंत्रणेचे सहनियंत्रक डॉ. ललित हारोडे यांनी, शासन वजनी मापे, विद्युत वजनकाटा यांच्या प्रमाणिकरणावर भर देत असल्याचे सांगत त्याचे उल्लंघन करणार्यावर संभाव्य दंडाची माहिती विषद केली.
या नाविन्यपूर्ण चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.