खारघर : रामप्रहर वृत्त
खारघरमधील नवीन मतदारांचे तयार झालेले स्मार्ट कार्ड तहसीलदार कार्यालयात उपलब्ध आहेत हे समजताच नगरसेवक अॅड. नरेश ठाकूर यांनी मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यासाठी खारघरमध्ये कॅम्प लावण्याची मागणी पनवेल तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत गुरुवारी (दि. 30) खारघरमध्ये मतदार ओळखपत्राचे वितरण होणार आहे. मतदारांना प्रत्येक वेळी पनवेल तहसील कार्यालयात येणे शक्य होणार नाही, खारघर भागातील प्रत्येक वॉर्डनुसार स्मार्ट कार्ड वाटपचे कॅम्प लावल्यास त्या भागातील नागरिकांना स्मार्ट कार्ड मिळणे सोयीचे होईल, असे नरेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले होते. निवेदन देताना नगरसेवक नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, सरचिटणीस किर्ती नवघरे, समीर कदम, वासुदेव पाटील उपस्थित होते. निवेदनाची दखल घेत पनवेल महसूल विभागामार्फत खारघरमध्ये मतदार ओळखपत्र वाटप होणार आहे. खारघरमध्ये मतदार ओळखपत्राचे वितरण गुरुवारी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत सेक्टर 3, वॉर्ड क्रमांक 5 मधील बेलपाडा गाव मंदिर व गोखले स्कूलमध्ये होणार आहे. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत सेक्टर 10, वॉर्ड क्रमांक 6 मधील बँक ऑफ इंडिया येथे व सेक्टर 15, 16, वॉर्ड क्रमांक 6 मधील डि. ए. व्ही. स्कूलमध्ये होणार आहे. सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत सेक्टर 13, वॉर्ड क्रमांक 4 मधील वॉर्ड ऑफिसमध्ये होणार आहे. ही माहिती महसूल विभागाकडून पनवेल तहसीलदारांनी दिलेल्या आदेशपत्रात दिली आहे.