पनवेल : रामप्रहर वृत्त
विद्यापीठाच्या कुलपतींच्या अधिकारावरच घाला घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि निष्क्रिय सरकार म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख तयार केली अशा महविकास आघाडी सरकारची वक्रदृष्टी आता विद्यापीठ विषयात वळली आहे. अनेक विषयांतील भ्रष्टाचाराचे आकडे रेकॉर्ड ब्रेक करून राज्यातील भ्रष्टाचाराचे इतर विषय कमी पडले म्हणून की काय, आता थेट विद्यापीठात भ्रष्टाचार करावा, विद्यापीठांच्या जमिनी घशात घालाव्या असा मानस ठेवून थेट कुलपतींच्या अधिकारांवरच घाला घालण्याचे पाप या सरकारने केले असल्याचा आरोप विक्रांत पाटील यांनी केला. ते पुढे म्हणाले की, विधानभवनामध्ये जे विधेयक घाईघाईने मंजूर करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला त्यावर चर्चा सुरु असताना ती चर्चा थांबवून थेट घाईघाईने विधेयक रेटून नेण्याचे काम त्याठिकाणी महाविकास आघाडी सरकारने केले. वर्षानुवर्ष असणारी रचना मोडून कुलपतींचे अधिकार कमी करून आता शिक्षण मंत्र्यांना प्र. कुलपती म्हणून अधिकार देण्याचा घाट यांनी घातला आहे. आता विद्यापीठातही यांचे सचिन वाझे घुसवण्यासाठी ही तयारी असल्याचे दिसते. भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या विषयात असला अन्याय सहन करणार नाही आणि म्हणून ही लढाई विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशाराही विक्रांत पाटील यांनी सरकारला दिला. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करणारे हे विधेयक महाविकास आघाडी सरकारने घाईघाईने मंजूर करून घेतले. विद्यार्थ्यांच्या भावीतव्याशी तडजोड होऊ देणार नाही त्यामुळे ही लढाई आता रस्त्यावर उतरून लढली जाईल. भविष्यात सचिन वाझेंसारखी मंडळी विद्यापीठात घुसवून डिग्र्या विकण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, असे खडेबोल पाटील यांनी सरकारला सुनावलेत.