Breaking News

नव्या विद्यापीठ कायद्याची ‘अभाविप’कडून होळी; कायदा रद्द करण्यासाठी उच्च शिक्षण सहसंचालकांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

राज्य सरकारने मंगळवारी (दि. 28) महाराष्ट्राच्या विधिमंडळात सार्वजनिक विद्यापीठ कायदा तिसरी सुधारणा विधेयक मंजूर करत शिक्षण क्षेत्रातील काळा दिवस साजरा केला आहे. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पनवेल महानगरमार्फत नवीन विद्यापीठ कायद्याची प्रत जाळून होळी करण्यात आली. यासोबत हा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा या संदर्भातील निवेदन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप यांना देण्यात आले. सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे बदल करत विधानसभेत लोकशाहीचे सर्व नियम पायदळी तुडवत कुठलीही चर्चा न करता अतिशय गोंधळाच्या वातावरणात सार्वजनिक विद्यापीठ कायदा तिसरी सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्यात आले. या विद्यापीठ कायद्यातील बदलामुळे शैक्षणिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढणार असून याचा विपरीत दूरगामी परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर होणार आहे. या कायद्यानुसार प्र. कुलपती हे पद निर्माण करत शिक्षणमंत्री हे पदसिद्ध प्र. कुलपती असणार असून याद्वारे विद्यापीठाच्या कारभारावर नियंत्रण ठेवून कब्जा करण्याचा डाव या राज्य सरकारने आखला आहे. कुलगुरू निवडतील राज्यपालांचे अधिकार क्षेत्र कमी करून राज्य सरकारच्या मर्जीतील कुलगुरू निवडण्याची सोय या विद्यापीठ कायद्यात या सरकारने केली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेवरील सदस्य देखील राज्य सरकारच्या शिफारशीनुसार निवडण्यात येणार असून येणार्‍या काळात विद्यापीठ हे राज्य सरकारचे एकदा महामंडळ बनल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रकारे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला राजकारणाचा आखाडा बनविण्याचा षडयंत्र राज्य सरकारने आखले आहे अभाविप हे कदापिही खपवून खेणार नाही, असे मत अभाविप पनवेल महानगरमंत्री वैष्णव देशमुख यांनी व्यक्त केले. संख्याबळाच्या जीवावर दडपशाही पद्धतीने पारीत केलेल्या विद्यापीठ कायद्यातील बदलाचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरोध करते. समाजातील प्रत्येक सुजाण नागरिक, शिक्षण तज्ञ, शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांनी पुढे येऊन आवाज उठविण्याची गरज आह. अभाविप येणार्‍या काळामध्ये व्यापक लढा उभारणार आहे, असे मत अभाविप प्रदेश मंत्री अमित ढोमसे यांनी व्यक्त केले. या वेळी अभाविप सहमंत्री नीरज खुरकुटे, श्रेयस मांडगे, सुशील यादव देवेंद्र चिंचालकर, साइराज सावंत ऋतिक सावंत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply