पनवेल : रामप्रहर वृत्त
देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. पनवेलमध्ये होणार्या या लसीकरण मोहीमेचे नियोजन शाळा, महाविद्यालयांमध्ये करावे, अशी मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांना निवेदन दिले आहे. यासोबत योग्य ते नियोजन व्हावे यासाठी लागणार्या मदतीसाठी तयार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेल्या संवादामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण मोहीम तसेच 60 वयोगटापुढील नागरिकांसाठी व फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार मुला-मुलींचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या लसीकरण केंद्रांवर ताण पडू नये म्हणून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी म्हणजेच इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लसीकरण व्हावे. त्यासाठी लागणारे सर्व नियोजन पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाबरोबर करता येईल, असे नगरसेविका रूचिता लोंढे यांनी निवेदनात नमूद केले आहे.