पोलादपूर तालुक्यातील अतिदूर्गम भागामधील कुडपण या गावाच्या नकाशावर ब्रिटीशांनी हिलस्टेशन असा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. राज्यातील एकमेव महावीरचक्र प्राप्त महायोध्दा नाईक कृष्णा सोनावणे यांचे हे मूळगांव आहे. मिनी महाबळेश्वर अथवा थंड हवेचे ठिकाण असो अथवा इको सेन्सेटिव्ह झोनमधील जैवविधता संरक्षणाचा जुन्या वनौषधी वनस्पतींचा अस्पर्शी जंगलपरिसर असो कुडपणची ओळख पर्यटनस्थळ म्हणून गेल्या 15 वर्षांपासून सर्वशृत होऊ लागली आहे.
गेल्या 17 वर्षांपासून कुडपणचा विकास करण्यासाठी तेथे रस्ते पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन ग्रामविकासमंत्री प्रभाकर मोरे आणि तत्कालीन राजिप अध्यक्षा अपेक्षा कारेकर यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन झाले खरे पण ते मुळ रस्त्यापासून दूर अंतरावर झाल्यामुळे काम रखडले. त्यानंतर तत्कालीन आमदार माणिक जगताप यांनी कुडपणच्या सर्व वाड्यांना जोडणारा रस्ता पूर्ण केला. खर्या अर्थाने या परिसरात पर्यटन विकासाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना या गावातील तरूण मुंबई व अन्य शहरामध्ये नोकरी, रोजगारासाठी रवाना झाले आणि पर्यटन विकासासाठीचे स्थानिक प्रयत्न राजकीय फाटाफूटीत तोकडे पडून पक्षनिवेशामध्ये विभागले गेले. कोणी येथील निसर्गसंपन्नतेला कोळशाचे उत्पादन घेऊन गावकीला फंड देण्याची भाषा केली तर कोणी लाकूडतोडीद्वारे परिसर भकास करण्याचा विकास सुचविला. महाबळेश्वरला पर्याय म्हणून ब्रिटीशांनी निवडलेल्या कुडपणच्या उपेक्षा राजकीय परिस्थितीवर अवलंबून राहू लागल्या आहेत. या परिस्थितीचा लाभ चाणाक्ष सरकारीबाबूंनी घेण्यास सुरूवात केली. कुडपणच्या पर्यटनविकासासाठी गेल्या 15 वर्षांमध्ये अनेक विकासकामे मंजूर करून आणून सरकारीबाबूंनी ठेकेदारांच्या संगनमताने बक्कळ निधी खर्च केला आहे. क्षेत्रपाळपासून आमलेवाडी, कुडपण बुद्रुक, कुडपण खुर्द आणि शेलारांचे कुडपणपर्यंतचा रस्ता हा सद्यस्थितीत कोट्यावधी रूपयांचा निधी खर्ची पडण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र, या खर्चाचे नियोजन आणि त्यातून साकारलेला विकास याबाबत सोशल ऑडीटींगचीही गरज आहे.
पोलादपूर तालुक्यातील देवपूर – गोळेगणी – क्षेत्रपाळ – कुडपण या रस्त्यावर 9 जानेवारी 2021 रोजी लग्नाचे वर्हाड घेऊन जाणार्या ट्रकला अपघात झाला होता. त्यावेळी रस्त्याच्या तकलादू संरक्षक कठड्यांसह ट्रक दरीत कोसळला होता. या अपघातात चालकासह चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलादपूर उपविभागाचा भोंगळ दर्जाहिन कारभार चव्हाट्यावर आला. त्यानंतर या रस्त्याच्या सुरक्षा उपाययोजना करण्याचे सुमारे 72 लाख 60 हजार 655 रूपयांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांनी जाहीर निविदेतून मंजूर झाल्याचे नमूद केले. याच रस्त्याच्या सुधारणांसाठी सुमारे 68 लाख 40 हजार 846 रूपयांचे कामही मंजूर करण्यात आले आहे. याखेरिज या रस्त्यावरील पुलांची पुनर्बांधणी, मोर्यांची दुरूस्ती आणि रस्ता दुरूस्तीसाठीदेखील 39 लाख 20 हजार 200 रूपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे देवपूर – गोळेगणी – क्षेत्रपाळ – कुडपण या रस्त्याच्या कामांसाठी तब्बल पावणेदोन कोटी रूपयांच्या खर्चाची तरतूद झाली आहे.
कुडपण येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाला सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निसर्ग वादळानंतर तसेच शासकीय इमारतीच्या दुरूस्तीबाबत आलेल्या निधीबाबत जाहिररित्या आरोपांना सामोरे जाताना बदनाम व्हावे लागले होते. पावसाळयाचा चार महिन्यांचा कालावधी धरून करायच्या कुडपणच्या तीन कामांच्या दर्जा आणि गुणवत्तेबाबत सर्वच पातळीवर सतर्कता बाळगली जाऊन त्याचा परिणाम पोलादपूर तालुक्यातील राजकीय पक्षनिवेशाच्या ठेकेदारीवर दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.
-शैलेश पालकर, खबरबात