नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई मनपा नेरूळ सेक्टर 8 प्रभाग 87 मध्ये डास र्निमूलन मोहीम, धुरीकरण राबविण्याची मागणी भाजप वार्ड अध्यक्ष अॅड. गणेश रसाळ यांनी महापालिका आयुक्त यांना एका निवेदनात केली आहे. नवी मुंबई मनपा नेरूळ सेक्टर 8 प्रभाग 87मध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. येथे छत्रपती शाहू महाराज आणि भाऊसाहेब शेरे अशी दोन उद्याने आहेत. उद्यानात सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांना डासाशी सामना करावा लागतो. विशेषतः सायंकाळी रात्री डासांचा उपद्रव खूपच असतो. प्रभागात डासांची घनता वाढली असून स्थानिक रहिवाशांना त्यामुळे साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. साथीचा आजार उपचार घेणार्या व्यक्तीबाबत पालिका प्रशासनाला काहीही माहिती नसल्याने साथीच्या आजाराचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास येत नाही. या प्रभागात डासांचा उद्रेक संपुष्ठात आणण्यासाठी सातत्याने व्यापक प्रमाणावर डास निर्मूलन मोहीम, औषध फवारणी, धुरीकरण राबविणे आवश्यक आहे. सिडको सोसायटी आवारात, एलआयजीच्या अंतर्गत भागात धुरीकरण करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, असे अॅड. रसाळ यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.