खारघर : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी खारघर येथील फणसवाडी येथे ट्रेकचे आयोजन केले. मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मर्यादा आल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. व्यायाम व मैदानी खेळ यापासून सुद्धा विद्यार्थी लांब होत चालल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. विद्यार्थ्यांना निसर्ग सान्निध्यात नेऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व्यायाम होण्याच्या उद्देशाने हा ट्रेकिंग उपक्रम राबविण्यात आला.
खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांनी तंदुरुस्तीचे महत्त्व व मानसिक ताणतणाव, चिंता व डिप्रेशन दूर करण्यासाठी ट्रेकचे महत्त्व खूप आहे, असे मत मांडले. शुभांगी शिरतोडे यांनी मुलांना दातांच्या स्वच्छतेबद्दलची माहिती दिली. या ट्रेकला अर्चना सकपाळ, विजय भोसले, प्रदीप शेलार, धोंडा आप्पा देसाई, शैलेश मोरबेकर, रूपेश काकडे यांच्यासह पन्नास शालेय विद्यार्थ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.