शहरात जनजागृती, विनामास्क फिरणार्यांवर कारवाईचा इशारा
मुरूड : प्रतिनिधी
कोरोना, ओमायक्रॉनला प्रतिबंध व्हावा, या हेतूने मुरूड नगर परिषदेतर्फे मंगळवारी (दि. 4) शहरात जनजागृती करण्यात आली. नगर परिषद कर्मचार्यांनी या वेळी शहातील मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी जाऊन कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
मुख्याधिकारी पंकज भुसे, कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, करनिरीक्षक नंदकुमार आंबेतकर, लेखापाल कपिल वेहेले, आरोग्य अधिकारी राकेश पाटील, नगररचना सहाय्य्क साहिल मुजावर, प्रकाश आरेकर, सुदेश माळी, प्रशांत दिवेकर, अभिजित कारभारी, सतेज निमकर यांच्यासह नगर परिषदेच्या सर्व कर्मचार्यांनी मंगळवारी मुरूड शहरातील मासळी मार्केट, भाजी मार्केट, बाजारपेठेत जाऊन तेथील विके्रते व नागरिकांशी संवाद साधला व कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.
मुरूड नगर परिषदेच्या कर्मचार्यांनी शहरातील शाळांमध्ये जावून सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर व मास्क वापरणे किती आवश्यक आहे, याची माहिती दिली, तसेच तेथील कर्मचार्यांनी दोन डोस पूर्ण केले आहेत का, याची खात्री केली. मास्क वापरण्याची सूचना केली.
15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, त्यासाठी गरज पडल्यास विशेष शिबिर लावण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी या वेळी दिली.
शहरात विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
-पंकज भुसे, मुख्याधिकारी, मुरूड नगर परिषद