Breaking News

शासकीय कर्मचार्‍याला मारहाण; तीन आरोपींना सश्रम कारावास

अलिबाग : प्रतिनिधी

शासकीय कर्मचार्‍याला मारहाण करणे तीन आरोपींना चांगलेच महागात पडले आहे. या आरोपींना अलिबाग सत्र न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अलिबाग-रोहा रोडवर वावे वळवली बस स्टॉपच्या दरम्यान 19 फेब्रुवारी 2018 रोजी मातीने भरलेले चार ट्रक थांबवून तलाठी कमलाकर गायकवाड आणि तलाठी सुदर्शन सावंत कायदेशीर कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपी सुधीर धर्मा चेरकर, हेमंत दशरत चेरकर आणि मनिष नथुराम पाटील यांनी तलाठी गायकवाड यांना शिविगाळ करून काठीने मारहाण केली. या प्रकरणी त्या तिघांविरोधात भादवी कलम 353,332,504,506 अन्वये रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी तदर्थ जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधिश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून स्मिता राजाराम धुमाळ यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी कमलाकर गायकवाड, साक्षीदार सुदर्शन सावंत, तहसीलदार प्रकाश संकपाळ, वैद्यकीय अधिकारी शीतल जोशी, पंच शेखर बळी आणि तपासीत अमंलदार जी. पी. म्हात्रे यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर तिनही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. आणि एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच दंडही ठोठावला आहे.

Check Also

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर लोकमत लोकनेता पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः रामप्रहर वृत्त राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रिय …

Leave a Reply