रस्त्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाची दखल
पनवेल : बातमीदार
स्वत:च्या वाडीवर जाण्यासाठी रस्ता व्हावा म्हणून सरकारी यंत्रणेशी झगडणार्या कोरलवाडीतील आदिवासींना रोज कराव्या लागणार्या पायपिटीचा अनुभव बुधवारी (दि. 22) पनवेलच्या नायब तहसीलदारांनी घेतला. वाडीवर जाण्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता व्हावा, या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागणीसाठी सोमवारी केलेल्या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम झाला. पनवेलच्या नायब तहसीलदारांनी कर्मचार्यांसमवेत जाऊन आदिवासींची परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली. पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीत कोरलवाडी नावाची आदिवासीवाडी आहे. वाडीत आदिवासींची 35 कुटुंब वास्तव्यास आहेत. या वाडीत जाण्यासाठी आजतागायत कधीच रस्ता बनविण्यात आला नाही. पूर्वापार येथील आदिवासी ग्रामस्थ तीन किलोमीटरची पायपीट केल्यानंतर वाहन येऊ शकेल, अशा रस्त्यापर्यंत पोहोचतात. सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचे बळी पडलेल्या आदिवासी बांधवांनी आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे सोमवारी येथील आदिवासींनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. आदिवासी वाडीपर्यंत पक्का रस्ता व्हावा, या मागणीसह बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा, पाण्याची समस्या आदी मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. पनवेल शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर तहसीलदार अमित सानप यांना निवेदन देण्यात आले होते. या वेळी नायब तहसीलदार एन. टी. आदमाने यांनी मोर्चेकरांना दोन दिवसांत वाडीवर पाहणी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. आदमाने यांनी दिलेला शब्द खरा करीत बुधवारी वाडीवर स्वत: कर्मचार्यांसमवेत जाऊन पाहणी केली. आदिवासी वाडीपासून रस्त्यापर्यंत म्हणजे तीन किलोमीटर आधीच आदमाने यांना उतरावे लागले. वाडीवर जाण्यासाठी त्यांनी उपस्थित आदिवासींसह तीन किलोमीटर पायी अंतर कापून आदिवासींची भेट घेतली. रस्त्याच्या समस्येसह अन्य समस्यांवरदेखील यावेळी उपस्थित आदिवासींशी चर्चा केली. पहिल्यांदाच कोणीतरी आदिवासी वाडीवर येऊन समस्येची पाहणी केल्याबद्दल वाडीतील नागरिकांनी केलेल्या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम झाल्याचे येथील नागरिक गुरुदास वाघे यांनी सांगितले.
आदिवासी वाडीवर जाण्यासाठी पाऊलवाट असून येथील नागरिक अजूनही याच वाटेवरून ये-जा करतात. कोरलवाडीवर रस्ता होणे गरजेचे असून यासंदर्भात लवकरच वनविभागाशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
-एन. टी. आदमाने, नायब तहसीलदार