कर्जत : प्रतिनिधी
33 मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी शनिवारी (27 एप्रिल) सायंकाळी पोलिसांनी कर्जत शहरातील सर्व भागात रूट मार्च केले.
18 पोलीस अधिकारी, 259 पोलीस कर्मचारी, 61 होमगार्ड असे 338 पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, केंद्रीय राखीव सुरक्षा बल जवान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष ठेवून आहेत. या विभागात 11 सेक्टर बनविण्यात आले आहेत. कर्जत मध्ये 5, नेरळ मध्ये 5 आणि माथेरानमध्ये 1 सेक्टर बनविण्यात आले आहे. या प्रत्येक सेक्टर मध्ये 1 पोलीस अधिकारी 3 पोलीस कर्मचारी संपूर्ण सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत राहणार आहेत. दोन दिवस नाकाबंदी करण्यात येणार असून या वेळी वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.
अतिदुर्गम भागातील येणार्या पेठ, कळकराई, तुंगी, ढाक या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांची उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी बिनतारी संदेश (वायरलेस सेट) बसविण्यात आले आहेत. अतिदुर्गम भागात उंच ठिकाणी असलेल्या मतदान केंद्राशी आमचा संपर्क राहावा म्हणून ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी घेरडीकर यांनी सांगितले.