



अलिबाग : प्रतिनिधी
मार्च महिन्यापर्यंत लांबलेली थंडी, मागील 15 दिवसांपासून वाढलेले तापमान या दुहेरी संकटामुळे रायगड जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची भीती रायगडातील आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत.
रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण 44 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 14 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास 22 हजार 424 मेट्रीक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदाच्या हंगामात डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात झाली. सुरुवातीला पडलेल्या थंडीमुळे उत्पादनक्षम क्षेत्रापैकी 80 ते 85 टक्के क्षेत्रावर मोहर आला होता, परंतु नंतर पुन्हा थंडीचा जोर वाढला. त्यामुळे पुन्हा मोहर आला. नंतर आलेला मोहर हा लांब होता. लांब मोहरामध्ये मादिवान कामी असते. त्यामुळे फलधारणा कमी झाली. त्यातच कीडीचा प्रदूर्भाव झाल्यामुळेदेखील मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला.
50 टक्के मोहरात फलधारण झाली, मात्र आंबा तयार होण्याच्या स्थितीत असतानाच एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाली. उष्णतेचे विपरीत परिणाम आंब्यावर झाले. आंबा डागाळू लागला. आंब्याची फळं मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरुवात झाली.
सुरुवातीला चांगली थंडी पडल्याने आंबा पीक चांगले येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना होती, परंतु लांबलेली थंडी व वाढलेल्या तापमानाचे आता आंबा पिकावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. आंब्याचे उत्पन्न कमी झाले. यंदा आंब्याचे उत्पादन 50 टक्केच झाले आहे. त्यामुळे सध्या आंब्याला चांगला दर मिळत आहे. असे असले तरी पुढील काही दिवसांत आंब्याची आवक वाढेल. परिणामी आंब्याचे दर घसरतील. त्यामुळे यंदा आंबा बागायदारांच्या एकूण उत्पादनात किमान 30 टक्के घट होईल, असे अलिबाग तालुक्यातील आंबा बागयतदार डॉ. संदेश पाटील यांनी सांगितले.