Breaking News

नाना पटोलेंना अटक करा -उपाध्ये

पंतप्रधानांबद्दल केलेल्या विधानावरून मागणी

मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणार्‍या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस भाजपच्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांनाच अटक करीत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी असा हा प्रकार असून पोलिसांनी पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी (दि. 18) पत्रकार परिषदेत केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपाध्ये म्हणाले की, आपण पंतप्रधानांबद्दल बोललोच नव्हतो असा खुलासा पटोले यांनी केला असून हा खुलासा हास्यास्पद आहे. चोर तो चोर वर शिरजोर असाच हा प्रकार आहे. नारायण राणे यांना अटक करताना जो न्याय लावला तोच न्याय पटोले यांनाही लावावा. पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणार्‍या पटोलेंविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस तयार नाहीत.

कोरोनाविरोधी लसीकरणाच्या मोहिमेत देशाने उच्चांकी आघाडी घेतलेली असताना महाराष्ट्रात मात्र ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळे लसीकरणाचा वेग थंडावल्याने कोरोनाचे भय कायम राहिले आहे असा थेट ठपका उपाध्ये यांनी या वेळी ठेवला.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार जनतेस दाखवत होते. मात्र, लसीकरणाचा वेग वाढवून नागरिकांना सुरक्षित करण्याऐवजी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देत ते स्वतःदेखील घरातच बसून राहिले. सर्व व्यवहार गुंडाळून व घराबाहेर जाणे टाळून ही लाट थोपविण्याचा मुख्यमंत्र्यांचा अजब ’गनिमी कावा’ महाराष्ट्राच्या अंगलट आला असून, देश लसीकरणाचा विक्रम करत असताना महाराष्ट्रात मात्र फैलावाचा विक्रम होत आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला.

लसमात्रांचा अतिरिक्त साठा महाराष्ट्राकडे असल्याचे स्पष्ट होऊन राज्य सरकारचा खोटेपणा समोर आला व ढिसाळपणा हेच लसीकरण मंदावल्याचे कारणही उघड झाले. आता खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच कमी लसीकरणाची कबुली दिली आहे. महाराष्ट्र हे मार्गदर्शक राज्य आहे, असे आरोग्यमंत्री म्हणत असले, तरी आता अन्य राज्यांकडून मार्गदर्शन घेण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. सरकारी बेफिकीरीचा फटका जनतेस बसत असेल तर त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल, असा इशाराही उपाध्ये यांनी दिला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply