पनवेल : वार्ताहर
केलेल्या कामाचे बिल मंजुर करण्यासाठी ठेकेदाराकडे दिड लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी 30 हजारांची लाच स्विकारणार्या सिडकोतील कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याला ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे कल्याण पाटील याने पुर्वीची तीन बिले मंजुर करण्यासाठी एक लाख 20 हजार रुपये स्विकारले होते.
या प्रकरणातील विपीन पाटील हा ठेकेदार खारघर येथील कोपरी गावात राहण्यास असून त्याने कळंबोली ब्रिज, खांदा कॉलनी व खारघर रेल्वे स्टेशनची कामे पुर्ण केली होती. या तीन बिलाचे सात लाख 56 हजार रुपयांचे बिल मंजुर करण्यासाठी कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याने दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर दिड लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी ठेकेदार विपीन याने कल्याण यांना एक लाख 20 हजार रुपये दिल्यानंतर त्याचे बिल मंजुर केले. त्यानंतर विपीन याने कळंबोली ब्रिज व खारघर रेल्वे स्टेशन येथील ब्रिजची कामे पुर्ण करून बिल सादर केले.
या वेळीदेखील कल्याण पाटील यांनी मागील तीन बिलाचे बाकी राहिलेले 30 हजार रुपये व चालु नवीन तीन बलांचे दिड लाख रुपये दिल्यानंतरच बिलावर सही करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे विपीन याने 18 जानेवारीला ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर कल्याण पाटील यांनी मागील बिलातील राहिलेली 30 हजारांची रक्कम घेऊन सीबीडीतील एमजीएम हॉस्पीटलजवळ बोलावले होते. या वेळी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कल्याण पाटीलला रंगेहात पकडले.