Breaking News

नवी मुंबईकर ओलांडणार उच्च मतदानाचा टप्पा?

नवी मुंबई ः बातमीदार

महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी (दि. 29) पार पडत आहे. त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. यात ठाणे, मीरा-भाईंदरसोबत नवी मुंबईतदेखील मतदान होणार आहे. कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांत घटलेल्या मतदानाच्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना चिंतेत टाकले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जागरूक मतदार मतदानाचा टक्का वाढवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून उमेदवारदेखील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे अनेक मतदारसंघांत दिसून आले आहे. निवडणूक आयोगाने व शासनाने अनेक क्लृप्त्या लढवूनदेखील अनेकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यात जमेची बाब ही की ग्रामीण भागातील लोकांनी आपले मतदानाचे कर्तव्य बाजावले असले तरीही शहरी भागात साक्षर नागरिकांत मात्र निरुत्साह पाहण्यास मिळाला. निवडणूक आयोगाने शहरी भागातील वाढत्या लोकसंख्येला अनुसरून सर्वांत जास्त जागृती शहरात केली आहे. असे असतानाही मतदानाचा कमी झालेला टक्का म्हणजे शासनाने प्रयत्न केलेल्या सर्व बाबींवर पालथ्या घड्यावर पाणीच पडले आहे. त्यामुळे नवी मुंबईसारख्या शहरी भागातील मतदानाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रचार थंडावला असला तरीही उमेदवार व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मात्र मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी फोनाफोनी करून छुप्या प्रचारावर भर दिला जात आहे. त्यात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सुटलेला नसल्याने बहिष्काराचे हत्यार उपसले आहे.

राष्ट्रवादीकडून बहिष्कार न टाकता मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी भाजप व सेनेकडून मात्र त्यावर टीका करण्यात आली आहे. त्यात प्रकल्पग्रस्तांत एकमत नसून एक गट बहिष्कारावर, तर दुसरा गट नोटाचे बटण दाबण्यावर ठाम आहे. नोटाला मतदान करून मतदानाचा टक्का वाढणार असला तरीही उमेदवारांना मात्र प्रकल्पग्रस्तांमध्ये असणार्‍या आपल्या मतदारांची काळजी वाटू लागली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून व पक्षाकडून नाराजांचे मन वळवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. पालिकेनेदेखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उपक्रम राबवला होता, तर ठाणे जिल्हाधिकार्‍यांकडूनही प्रकल्पग्रस्तांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. सोशल मीडियावरदेखील मतदानाची जागृती करण्यात येत असून काही वाहिन्यांनी मतदान करा व फोटो पाठवा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांव्यतिरिक्त खासगी संस्थांकडूनही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

त्यात पाहिल्यांदाच मतदान करणारी तरुण पिढी उत्साहात असून मत देऊन सेल्फी काढण्यासाठी सारसावलेली असल्याची चर्चा अनेक तरुणांकडून ऐकण्यास मिळत आहे. एकूणच पुण्यासारख्या शहरी भागात मतदानाचा टक्का कमी झाल्याने राहण्याजोगे शहर म्हणून देशात पुण्यानंतर द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या नवी मुंबई शहरातील नागरिक मतदानाची टक्केवारी वाढवून प्रथम क्रमांकावर येतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply