Breaking News

दुर्गम केंद्रांवरही पोहचले मतदान कर्मचारी

कर्जत ः बातमीदार

मावळ मतदारसंघात होणार्‍या मतदानासाठी रायगड जिल्ह्यातून मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या केंद्रांवर रुजू होत आहेत, मात्र कर्जत तालुक्यातील दूरवरील आणि दुर्गम भागातील मतदान केंद्रांवरही परिश्रमपूर्वक सर्व साहित्य घेऊन पोहचलेल्या कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वत: डोंगराळ भागात जाणार्‍या या पथकाशी सातत्याने संवाद साधत होते.

विशेष म्हणजे वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्यांमधून आणि प्रसंगी डोंगर चढून आपल्या इच्छितस्थळी पोचणार्‍या या पथकातील कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच समाधान दिसत होते. गावकर्‍यांनीदेखील त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत हे तीन तालुके मावळ मतदारसंघात येतात. यातील कर्जतमधील 54 क्रमांकाचे केंद्र तुंगी येथे असून, डोंगरमाथ्यावरील या गावात 344 मतदार आहेत. मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर 27 किमी असून केवळ कच्च्या रस्त्याने अथवा पायवाटेनेच या ठिकाणी पोहचता येते. 274 मतदारसंख्या असलेले पेठ या ठिकाणीदेखील 101 क्रमांकाचे मतदान केंद्र असून, या ठिकाणी जीपने जाता येते, मात्र रस्ता अवघड आहे. मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर 24 किमी आहे. 177 मतदार असलेल्या ढाक या वाडीमध्ये 156 क्रमांकाचे मतदान केंद्र असून, मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर 10 किमी आहे. येथेही अवघड अशा रस्त्याने जावे लागते. 100 मतदार असलेले कळकराई हे 179 क्रमांकाचे मतदान केंद्र आहे. येथेदेखील केवळ छोट्या वाटेने जाता येते. स्थानिक गावकरी, तलाठी तसेच इतरांनीदेखील या कर्मचार्‍यांना सर्व साहित्य वाहून नेण्यासाठी मदत केली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply