Wednesday , June 7 2023
Breaking News

शेतकर्‍यांच्या जमिनींचे जबरदस्तीने भूसंपादन केल्यास तीव्र आंदोलन करू

आमदार प्रशांत ठाकूर यांचा राज्य सरकारला इशारा

पनवेल : रामप्रहर वृृत्त
शेतकर्‍यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरसाठी निताळे, वावंजे, नितळस या गावांमधील जमिनीची मोजणी करू नये, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचे विभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. जबरदस्तीने जमीन संपादित केल्यास शासनाला संघर्षाला सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी विभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरसाठी (एमएमसी) पनवेल तालुक्यातील निताळे, वावंजे, नितळस या गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे समजते, परंतू या प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या जमिनीच्या मोबदल्यात किती रक्कम अथवा काय भाव निश्चित करण्यात आला आहे, याबाबत शेतकर्‍यांना अद्याप कळविण्यात आलेले नाही. जमीन संपादनाच्या प्रक्रियेनुसार मोजणीचे काम सुरू केले आहे. मोबदला निश्चित न करता शासनाकडून जबरदस्तीने होणारी मोजणी प्रक्रिया यामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन असंतोष पसरला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी जमीन मोजणी प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे.
जमीन संपादनाचा मोबदला तसेच इतर गोष्टींसंदर्भात निर्णय घेतल्यानंतरच जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे न झाल्यास नाईलाजास्तव शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे.
शेतकर्‍यांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरसाठी (एमएमसी) निताळे, वावंजे, नितळस या गावांमधील संपादित करण्यात येणार्‍या जमिनींची मोजणी पूर्णपणे थांबवावी; अन्यथा शासनास संघर्षाला सामोरे जावे लागेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनातून अधोरेखित केले आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply