Breaking News

मळा गावाला रस्ता केव्हा मिळणार?

रस्ते हे विकासाचे साधन आहे. जेथे रस्ता आहे, तेथे विकास होतो. त्यामुळे गाव तिथे रस्ता हे शासनाचे धोरण आहे. प्रत्येक गाव रस्त्याने जोडाले गेले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, तरीदेखील अनेक गावांमध्ये आजही रस्ते नाहीत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग हा प्रगत तालुका आहे. या तालुक्यातदेखील काही गावांमध्ये रस्ते नाहीत. त्यापैकी एक गाव आहे मळा. गेली चाळीस वर्षे येथील ग्रामस्थ रस्त्यासाठी संघर्ष करत आहेत. परंतु या गावात रस्ता होऊ शकलेला नाही. जर अलिबाग तालुक्यातील गावाची ही आवस्था असेल तर इतर दुर्गम तालुक्यातील गावांची काय गत असेल, याचा विचार केला पाहिजे. रस्त्यासाठी जागा देण्यास काही शेतकर्‍यांचा विरोध आहे. तेथील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या शेतकर्‍यांशी संवाद साधून रस्त्याचा मार्ग मोकळा केला पहिजे. अलिबाग तालुक्यातील मिळकतखार ग्रुपग्रामपंचायत हद्दीत मळा हे 40 घरांचे दिडशे लोकसंख्या असलेले गाव आहे. मिळकतखार गावातील काही ग्रामस्थांनीच गावात घरे बांधण्यासाठी जागा नसल्याने शेतावर आपले घर बांधले आणि मळा हे गाव वसले. 2002-03 साली नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत साडे दहा लाख रुपये खर्च करून गावात जाणारा रस्ता बांधला होता. मात्र मळा गावाच्या वेशीवर शेती असल्याने बांधावरून जाणारा रस्ता अपूर्णच ठेवला आहे. काही शेतकर्‍यांचा रस्त्यासाठी जागा देण्यास विरोध आहे. गावात रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ आजारी व्यक्ती, गरोदर माता यांना उचलून मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन जातात. त्यानंतर त्यांना वाहनाने रुग्णालयात नेत आहेत. पाण्याचीही समस्या मोठी असल्याने गावात नळ असूनही आठ दिवसाने पाणी येत आहे.  रस्ता नसल्यामुळे टँकर गावात पोहचत नाही. टँकरचे पाणी आणण्यासाठी एक किलोमीटर अंतरावरून महिलांना डोक्यावर हंडा घेऊन शेताचा बांध तुडवत घरी यावे लागते. पावसाळ्यातही रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विजेचीही समस्या गावात भेडसावत आहे. गावात घराचे काम करायचे झाल्यास अनेक अडचणी येतात. मोठे वाहन गावात येऊ शकत नाही. गावात जाणारा रस्ता नसल्याने चारचाकी वाहनेही ग्रामस्थांना गावाच्या बाहेर ठेवावी लागत आहेत. शाळकरी मुलांनाही शेताच्या बांधावर कसरत करत शाळेत जावे लागत आहे. केवळ रस्ता नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना मळा ग्रामस्थांना करावा लागत आहे. गावात येणारा रस्ता शेताच्या बांधावरून येणारा आहे. अर्धा रस्ता झाला आहे. त्याचीदेखील दुरावस्थ झाली  आहे. रस्ता नसल्याने गावाचा विकास खुंटला आहे. ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतांच्या बांधावरून गावात जावे लागते. हाच रस्ता रूंद करून गावाला चांगला रस्ता करावा, अशी येथील जनतेची मागणी आहेे. परंतु काही शेतकर्‍यांचा रस्त्यासाठी जमीन देण्यास विरोध आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बसून यावर चार्चा करून मळा गावात रस्ता नेण्यासाठी मार्ग काढला पाहिजे.

बोडणीतील महिलांची पाण्यासाठी वणवण

अलिबाग तालुक्यातील बोडणी हे चार हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावाला डिसेंबर महिन्यातच   पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही नळपाणी पुरवठा योजना सातत्याने नादुरूस्त असते. त्यामुळे पाणी गावात पोहोचतच नाही. या गावातील महिलांना पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. दुसर्‍या गावात जावून  फुटलेल्या जलवाहिनीवरून पाणी भरावे लागत आहे. सध्या गावात पाण्याची कुठलीच सोय नाही. त्यामुळे इथल्या महिलांना रात्रभर जागून दूरवर जावून पाणी भरावे लागत आहे. फुटलेल्या जलवाहिनीवरून पाणी भरण्याची वेळ या महिलांवर आली आहे. इथं पाणी भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत अक्षरशः झुंबड उडालेली असते.  जवळपास 20 गावांसाठी राबवण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या  रेवस प्रादेशिक नळपाणी योजनेवरील हे शेवटचे गाव असल्याने इथल्या नळाला कधी पाणी पोहोचतच नाही. पाण्याचा दुसरा उद्भव नाही. त्यामुळे पाणीटंचाई या गावाच्या पाचवीलाच पुजलेली आहे. वर्षानुवर्षे हे असंच सुरू आहे. पिण्याबरोबरच अन्य वापरासाठीदेखील पाणी विकत घ्यावं लागतं. एका पिंपासाठी 80 ते 200 रूपये मोजावे लागतात. कधीकाळी नळाला पाणी आलंच तर ते भरण्यासाठी अक्षरशः उड्या पडतात आणि त्यातून वादाचे अनेक प्रसंग उद्भवतात. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शासनातर्फे सध्या जलजीवन मिशन अभियान राबवले जात आहे. परंतु बोडणीकरांना त्याचा काहीच लाभ होताना दिसत नाही. गावात नळ आहेत, पण त्यांना पाणीच नाही. विहीर आणि तलावाचे पाणी दूषित आहे दुसरा उद्भव नसल्याने केवळ नळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. जलजीवन मिशन अंतर्गत दरडोई 50 ते 55 लीटर पाणी पुरवण्याचे धोरण आखण्यात आले आहे. परंतु ही योजना राबवणारी यंत्रणा असलेली रायगड जिल्हा परिषद यात सपशेल फेल ठरली आहे. बोडणी गावात गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. बोडणीकरांच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply