Breaking News

‘सीकेटी’त राष्ट्रीय मतदार दिन साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची संस्थापना झाली, तर शासनाने सन 2011पासून 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचे जाहीर केले. लोकशाहीत मतदाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हा संदेश महाविद्यालयीन युवकांमध्ये रुजविण्यासाठी, मतदार नोंदणीचे गांभीर्य पटवून देण्याकरिता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त दर्जाप्राप्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नुकतेच (दि. 25) महाविद्यालयीन संकुलात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, कोकण परिक्षेत्रातील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संजय जगताप, पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, महापालिका उपायुक्त विठ्ठल डाके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व विषद करीत महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांनी मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत मतदार नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले. तहसीलदार विजय तळेकरांनी एका मताच्या मूल्याबाबत चर्चा करीत मतदान नोंदणी प्रक्रिया व त्याची पूर्तता करणार्‍या आवश्यक दस्तऐवजांविषयीची इत्यंभूत माहिती दिली. कोकण परिक्षेत्राच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी लोकशाही शासन व्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगत त्याचे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासात असणारे योगदान उद्धृत करून पुढे सांगितले की, भारताची तरुणांचा देश म्हणून ओळख असून अशा उदयोन्मुख राष्ट्राचा पाया हा जागरूक आणि जबाबदार मतदार आहे. त्यामुळे मतदार साक्षरता व नोंदणीविषयीचे उपक्रम सभोवतालच्या परिसरात प्रसिद्ध होणे अगत्याचे आहे. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांच्या संबोधनात, व्यक्तीच्या व्यक्त होण्यावर भर दिला. व्यक्तीचे व्यक्त होणे गरजेचे असून व्यक्ती व्यक्त झाल्याशिवाय त्याच्या समस्यांचे निराकरण होणे नाही, असे ते म्हणाले. याचबरोबर त्यांनी युवकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. मतदानाची प्रक्रिया समजावून सांगताना त्यांनी अनेक ऐतिहासिक संदर्भ दिले. लोकशाहीच्या यशस्वितेसाठी लोकशाहीच्या दोन्ही चाकांचे समान पद्धतीने कार्यान्वयन होणे गरजेचे असून मतदार व राज्यकर्ते यांच्या समन्वयातूनच भारतीय लोकशाही यशस्वी होईल, असेही प्रतिपादन त्यांनी केले. मान्यवरांच्या संबोधनानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित बहुविध स्पर्धांच्या विजेत्यांची घोषणा करीत संबंधित विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पदेऊन गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सत्कारानंतर समग्र उपस्थितांना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे यांनी जागरूक मतदाराची शपथ देऊ केली व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास मान्यवर अतिथींसमवेत महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर, ग्रंथपाल प्रा. रमाकांत नवघरे, कला शाखाप्रमुख डॉ. बी. एस. पाटील, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बी. व्ही. जाधव आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, डॉ. योजना मुनिव, प्रा. सागर खैरनार, प्रा. आकाश पाटील, प्रा. अपूर्वा ढगे, सांस्कृतिक समन्वयक प्रा. गणेश जगताप यांनी विषेश परिश्रम घेतले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थचे चेअरमन, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी कौतुक केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply