अलिबाग : रामप्रहर : स्वच्छतेमुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच आरोग्य सुदृढ बनण्यास मदत मिळते. स्वच्छतेचा मंत्र सर्वांनीच जोपसला पाहिजे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या अलिबाग सेवा केंद्राच्या सहाय्यक संचालिका अंजू दिदी यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय आणि रायगडचा युवक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग शहरातील स्मशानभूमी समोरील फुल नगर झोपडपट्टी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्या वेळी रायगडचा युवक फाऊंडेशनचे प्रमुख जयपाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात अंजू दिदी मार्गदर्शन करीत होत्या. जयपाल पाटील यांचेही समयोचित भाषण झाले.
अलिबाग स्मशानभूमी समोरील जागेत पारधी समाजाचे लोक राहतात. याच ठिकाणी डंम्पिंग ग्राऊंड आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते. ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय आणि रायगडचा युवक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 4 वाजता या परिसरात स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी मास्क, हातमोजे दिले होते. सुनयनादिदी, अश्विनभाई, श्रीरंगभाई, दीपाली रोकडे, शारदा गवळी, मालन पवार यांच्यासह त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. या वेळी मुलांना स्वतःच्या आरोग्याचे महत्त्व समजावे, यासाठी टुथ ब्रश आणि कोलगेट पेस्टचे वाटप करण्यात आले.