पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई डाक विभागामार्फत पनवेल हेड पोस्ट ऑफिसच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्विसेस, नवी मुंबई रीजन सरण्या यु यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या कार्यक्रमात स्माइल्स फाउंडेशनच्या वतीने कर्मचार्यांच्या मुलांना ’बायजूस ई-लर्निंग’ची मोफत सदस्यता प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे डाक विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणार्या कर्मचार्यांना उत्कृष्टता प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी नवी मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. अभिजित इचके, स्माईल्स फाउंडेशनचे डॉ. धीरज आहूजा, उमा आहूजा आणि नवी मुंबई डाक विभागातील कर्मचारीवर्ग यांची उपस्थिती होती.