मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि. 1) संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी तब्बल दीड तास अर्थसंकल्पाचे वाचन केले आणि पुढील आर्थिक वर्षासाठी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या. महत्वाचे म्हणजे आरबीआयचे डिजिटल चलन येईल, अशी घोषणा या वेळी त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुल करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. तर, या अर्थसंकल्पावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांना समर्पित अर्थसंकल्प अशी प्रतिक्रिया दिली आहे. भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार, असे फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटलेय. आजचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर करणारा असून यामध्ये सर्वच घटकांना दिलासा देण्यात आल्याचे त्यांनी म्हटलेय. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर आणि बलशाली भारताचे प्रतीक आहे. शेतकर्यांना समर्पित अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला. तसेच शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रोनचा शेतीसाठी वापर करून घेतला जाणार आहे. शेतकर्यांना बाजार उपलब्ध व्हावा, कोणत्याही मध्यस्थाशिवाय त्यांच्या मालाची थेट विक्री करता यायला पाहिजे, त्यांना शेतमालाचा योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी विशेष सवलती या अर्थसंकल्पात करण्यात आल्या, असे फडणवीसांनी सांगितले.
‘आगामी 25 वर्षांतील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प’
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन देशाला आत्मनिर्भर आणि संपन्न बनविण्यासाठीचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. आगामी पंचवीस वर्षांतील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणार्या या अर्थसंकल्पासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणार्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवून देशात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. गुंतवणूक, उत्पादन, शेती, शिक्षण, सामाजिक कल्याण, ग्रामविकास, शहरांचा विकास, वैद्यकीय सुविधा अशा सर्व क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देश आर्थिकदृष्ट्या प्रगत व्हावा आणि त्याचबरोबर स्वदेशी उद्योगांना चालना देऊन देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी महत्त्वाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, डिजीटल रुपया, किसान ड्रोन्स, लष्करी उत्पादनांमध्ये आत्मनिर्भरता वाढविण्यासाठीची तरतूद, ग्रामीण आणि वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक चॅनेल्स वाढविणे, डिजीटल विद्यापीठ, जमिनीची कागदपत्रे डिजिटल स्वरुपात, ई पासपोर्ट, राज्यांच्या विकासासाठी एक लाख कोटींचा निधी हे संकल्प अत्यंत कल्पक आणि उपयुक्त आहेत.