जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था गेली 70 वर्षे भारतातील सर्व निवडणुका यशस्वीपणे पार पाडत आली आहे. यात केवळ यंत्रणेचा आणि मतदार संख्येचा बदल झाला आहे, मात्र आजही भारतातील प्रत्येक नागरिकाचा भारतीय सेना, न्यायालय आणि भारतीय निवडणुका यांच्यावर ठाम विश्वास आहे. हाच विश्वास देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणार आहे. या तीन व्यवस्थेत सेनेच्या युद्धाची कामगिरी सैन्याचे मनोबल आणि युद्धसामग्री यावर ठरते, न्यायालयाचा न्याय साक्षी-पुरावे यांच्या आधारे ठरतो, तर निवडणुकांची यशस्विता ही विचारांवर ठरते. त्यामुळे निवडणुका ही एक विचारांची लढाई असून याच पद्धतीने ती लढली गेली पाहिजे.
आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा हा देश कसा चालवावा, असा प्रश्न त्या वेळच्या नेत्यांसमोर होता. तत्कालीन गव्हर्नर सरकार पद्धतीचा अवलंब करावा की राजेशाहीचा स्वीकार करावा की मार्क्सवादी कम्युनिस्ट पद्धतीचा अवलंब करावा, असा पेच निर्माण झाला होता, मात्र तेव्हा सर्व नेत्यांनी एकमताने लोकशाही प्रणालीचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची नियमावली, कायदे अर्थात घटना लिहिण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आली. तेव्हापासून भारताच्या दोन हजार वर्षाच्या इतिहासाच्या काळात प्रथम 26 जानेवारी 1950 पासून प्रत्येक नागरिकाला देशाचे सरकार निवडण्याचा अधिकार मताच्या स्वरूपात मिळाला. तेव्हापासून भारताची जगातील सर्वात मोठी निवडणूक यंत्रणा अस्तित्वात आली आणि आजही ही निवडणूक आयोग संस्था प्रमाणिक आणि निःपक्षपातीपणे कार्य करत आहे.
मुळातच निवडणुका ही एक विचारांची लढाई आहे. उमेदवारांने आपले विचार घेऊन जनतेसमोर यायचं आणि विचार, धोरण यांच्या प्रभावाने जनतेचा विश्वास निर्माण करून हा विश्वास मताच्या रूपात मिळवायचा आहे, मात्र बदलत्या समाजरचनेत या निवडणुकीचं स्वरूपही बदलू लागलं आहे. उमेदवार हे विसरून गेले आहेत की ही विचारांची लढाई आहे. आज निवडणुकीच्या या रणसंग्रामात युद्धापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मनी पॉवर आणि मसल पॉवरच्या जोरावर निवडणुका खेळल्या जात आहेत. लोकप्रतिनिधींच्या विश्वासाची जागा आज दहशदीने घेतली आहे. मतदार या दहशती खाली मतदान करत आहे. त्यामुळेच कदाचित मतदानाचा टक्का घसरला आहे. ही परिस्थिती देशाच्या एकात्मतेला आणि स्वातंत्र्याला घातक आहे. याला आज कुठेतरी लगाम घालण्याची वेळ आली आहे. जगाचा इतिहास सांगतो की तलवारीच्या जोरावर तुम्ही केवळ प्रदेश जिंकू शकता लोकांची मने नाही जिंकू शकत. आपले आदर्श आणि जाणाते राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हेच हेरलं, शत्रूच्या प्रदेशावर हल्ला करण्यापूर्वी महाराजांनी प्रथम तिथल्या लोकांची मनं जिंकली आणि पुढे युद्धात या जनतेनेच महाराजांना मदत केली आणि म्हणूनच या रयतेच्या स्वराज्याची निर्मिती झाली.
आज जग बदलले आहे, जगाच्या पटलावर प्रसारमाध्यमांचे जाळे पसरले आहे. चांगले काय आणि वाईट काय? हे या
प्रसारमाध्यमांतून लोकांपर्यंत जात आहे. आज क्रांती घडविण्यासाठी लढाईची किंवा हत्यारांची गरज नाही, तर विचारांच्या जोरावरच आजची क्रांती घडणार आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शक्तिशाली ब्रिटिश राजवटी विरोधात बापूजींनी जो सत्यग्रह या विचाराच्या लढाईचा मार्ग स्वीकारला आणि यशस्वी करून दाखविला. तशीच विचारांची क्रांती ही आणीबाणीनंतर पुन्हा एकदा या देशाने पाहिली आहे. त्या वेळच्या मजबूत आणि ताकदवर इंदिरा सरकार विरोधात जनतेतूनच विचारांची क्रांती पुढे आली आणि यशस्वी झाली. आजही आपण पाहिले की भ्रष्टाचाराने देश पोखरलेल्या काँग्रेसविरोधात 2014 मध्ये मोदींच्या रूपात पुन्हा एकदा विचारांची क्रांती या देशात झाली होती. देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त ठेवायचे असेल, आपले स्वातंत्र अबाधित ठेवायचे असेल, प्रगती साधायची असेल आणि आपला देश सुरक्षित ठेवायचा असेल, तर मतदान करताना मतदारांनी पैसे, समाज, जात, धर्म आणि दहशत याला न जुमानता मतदान केले पाहिजे आणि शंभर टक्के मतदान केले पाहिजे.
आपल्या देशाचे कणखर आणि खंबीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चांगला संदेश देशाच्या जनतेला आणि निवडणुकीतील
उमेदवारांना दिला आहे. ते म्हणतात, निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार हा तुमचा निवडणुकीपुरताच प्रतिस्पर्धी असतो, त्याला तुमचा दुश्मन समजू नका. तो जरी तुमच्या विरोधात निवडणूक लढवित असला, तरी तुमच्याप्रमाणे तोही लोकशाही मजबूत आणि यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचे हे विचार निवडणूक लढविणार्या प्रत्येक उमेदवाराने अवलंबिले, तर ही लोकशाही आणि निवडणूक यंत्रणा यशस्वी ठेवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे निवडणूक ही विचारांची लढाई आहे ती विचारांनीच लढली पाहिजे हेच या ठिकाणी पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.
-महेश शिंदे