Breaking News

उन्हाचा तडाखा तरीही मतदानाचा धडाका

खोपोली-खालापुरात सरासरी 58 टक्के मतदान

खोपोली : प्रतिनिधी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी खालापूर तालुका व खोपोली नगरपालिका क्षेत्रातील एकूण 192 मतदान केंद्रांवर सोमवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी तीन तास सर्वच मतदान केंद्रांवर बर्‍यापैकी गर्दी झाली होती, मात्र 12 वाजल्यानंतर गर्दी कमी झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत अशीच स्थिती होती. खालापूर तालुका व खोपोली शहरात सरासरी 58 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा, स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सर्व प्रकारची व्यवस्था व नियोजन करण्यात आले होते. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील एकूण 12 गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना दुपारी दोन वाजेपर्यंत खोपोलीत येण्यासाठी पोलिसांनी बंदी घातली होती.

कालच्या मतदान प्रक्रियेवर वाढलेल्या तापमानाचा व लग्न हंगामाचा परिणाम झाल्याचे दिसले. त्यामुळे दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत बहुतेक सर्व मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. अनेक मतदारांकडे मतदान ओळखपत्र असूनही आपले नाव नेमके  कोणत्या केंद्रात आहे याबाबत स्पष्टता नसल्याने अशा मतदारांनी वैतागून मतदान न करता घरी जाण्याच्या घटनाही खोपोलीत अनेक ठिकाणी पाहावयास मिळाल्या. तरीही पहिल्यांदा मतदान करणारे तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, झोपडपट्टी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत भाग घेतल्याचे दिसले, मात्र शहरातील अतिसुशिक्षित नोकरदार व उच्चभ्रू मतदारांनी आपली उदासीनता या वेळीही कायम ठेवत मतदान न करता घरीच बसण्यात धन्यता मानल्याचे दिसून आले. त्यामुळे या भागातील मतदान 60 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे सरासरी 58 टक्के इतकेच झाले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply