राजकीय बेधडक विधाने करून राजकारणात गुगली टाकण्याची कसब ज्येष्ठ नेते शरद पवार यांना चांगलीच अवगत आहे.आता सुद्धा त्यांनी पंतप्रधानपदासाठी कोण उमेदवार अपेक्षित आहे हे जाहीर करून महाआघाडीत नवा चर्चेचा वाद उत्पन्न केलेला आहे. त्यांच्या या विधानाचा काय अन्वयार्थ काढायचा हे प्रत्येकानेच ठरवणे उचित ठरेल.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरळीत पार पडत असतानाच आता राजकीय हालचालींना वेग येऊ लागल्याचे जाणवू लागले आहे. चौथ्या टप्प्यापर्यंत देशातील निम्म्याहून अधिक मतदारसंघांत निवडणुका झालेल्या असल्याने तेथील जनमताचा कौल घेत अनेक दिग्गज नेते आपापल्यापरीने राजकीय भाकिते व्यक्त करू लागली आहेत. अर्थात अशा राजकीय भाकितांना काहीच अर्थ नसतो. केवळ चर्चेत राहण्यासाठी ही भाकिते व्यक्त करून आपला टीआरपी वाढविण्याचा केलेला हा प्रयत्न असतो असेच म्हणावे लागेल. असा टीआरपी राखण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार हे कमालीचे माहीर आहेत. चौथा टप्पा संपत असतानाच त्यांनी महाआघाडीत पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्याऐवजी ममता बॅनर्जी, मायावती आणि एन. चंद्राबाबू नायडू हे योग्य उमेदवार असल्याचा दावा करीत महाआघाडीत नवीन चर्चा उपस्थित केली आहे. अर्थात ही चर्चा उपस्थित करण्यामागे पवारांचा राजकीय हेतूही असू शकतो. जर देशात राजकीय परिवर्तन घडून महाआघाडीची सत्ता आलीच, तर काँग्रेसला पंतप्रधानपद मिळू नये अशीच त्यांची भूमिका आहे. काँग्रेसकडे नेतृत्व गेल्यास साहजिकच राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधानपदाची धुरा येईल आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आपण एक सहमंत्री म्हणून काम करणे हे पवारांना बिलकूल पसंत पडणारे नाही. त्यामुळे त्यांनी आधीपासूनच पंतप्रधानपदासाठी ममता, मायावती आणि चंद्राबाबूंचे नाव चर्चेत टाकले आहे. याचाच अर्थ या तिन्हीही नेत्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यताही धूसर असू शकते त्यातून कदाचित एक ज्येष्ठ नेते म्हणून महाआघाडीतील कुणीतरी आपले नाव सुचविल अशीही अपेक्षा पवारांना वाटते. अर्थात या जर तरच्या गोष्टी आहेत. अजून मतदानाचे तीन टप्पे बाकी आहेत. देशात मोदींना मानणारा मोठा वर्ग निर्माण झालाय. चारही टप्प्यात जे मतदान झाले ते विद्यमान सरकारला अनुकूल झाल्याचेही बोलले जाते. अशा स्थितीत पवारांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणे हे हास्यास्पदच म्हटले पाहिजे. अशा प्रकारे विधान करण्यामागे पवारांचा हेतू चर्चेत राहण्याचाच आहे. कारण आता राज्यातील चार टप्प्यातील मतदान संपले आहे. अन्य राज्यात पवारांना जाहीर प्रचारासाठी महाआघाडीत कुणी निमंत्रितही केलेले नाही. अशा वेळी अशी बेधडक विधाने करून प्रसारमाध्यमांच्या चर्चेत राहणेच पवार पसंत करताना दिसत आहेत. पवारांच्या या विधानावरून सोशल मीडियावरही चर्चा रंगली, शिवाय सर्वच प्रसारमाध्यमांना देखील त्यांच्या विधानांची दखल घेणे भाग पाडले. याचाच अर्थ पवार निकाल लागेपर्यंत अशीच काहीतरी विधाने करून प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहतील. यापूर्वीही अशीच बेधडक विधाने करून पवारांनी राजकीय धमाल उडवून दिलेली आहे. तशाच प्रकारची धमाल या वेळीही त्यांनी उडवून दिली आहे. असाच त्याचा अन्वयार्थ काढावा लागेल.