अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील मिळकतखार मळा येथील रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा, अशा सूचना प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी अलिबाग पंचायत समितीला दिल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील मिळकतखार गु्रपग्रामपंचायत हद्दीत मळा हे 40 उंबर्यांचे सुमारे दीडशे लोकसंख्या असलेले गाव. या गावासाठी 2002-03 साली नाबार्ड मार्फत ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत साडेदहा लाख रुपये खर्च करून रस्ता बांधला होता. मात्र मळा गावाच्या वेशीवर शेती असल्याने रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. काही शेतकर्यांचा रस्ता देण्यास विरोध आहे. त्यामुळे पुढचा प्रवास बांधावरूनच करावा लागतो. गावात जाणारा रस्ता नसल्याने आजारी व्यक्ती, गरोदर माता यांना गावातील व्यक्ती उचलून मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन त्यानंतर वाहनाने रुग्णालयात नेत आहेत. टँकरने पाणी आणताना दोन अडीच किलोमीटर वरून महिलांना डोक्यावर हंडा घेऊन शेताचा बांध तुडवत यावे लागते. पावसाळ्यातही रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावात घराचे काम करायचे झाल्यास ग्रामस्थांना अधिकचा खर्च सहन करावा लागत आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांनी मळा ग्रामस्थांना भेडसावणार्या समस्या मांडल्या. तसेच ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अलिबागचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांना निवेदन दिले. त्याची दखल घेत प्रांताधिकार्यांनी अलिबागच्या गटविकास अधिकार्यांना रस्त्याकरिता भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा, अशी सूचना केली आहे.