अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील पोलिसांच्या गोळीबार सरावावेळी डोंगरापलिकडील कार्ले गावात बंदुकीच्या गोळ्या येण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मागील आठवड्यात अशीच घटना घडली. एक गोळी घराच्या छपरातून आत आली. या घटना आता कार्ले गावाला नवीन राहिलेल्या नाहीत. या गोळ्यांमुळे कुणी जखमी झालेला नाही. वास्तविक पाहता परहूर आणि कार्ले या दोन गावांच्यामध्ये एक डोंगर आहे. तरीदेखील या गोळ्या इतक्या वेगात कार्ले गावात येतात कशा ? हे एक रहस्यच आहे. कार्ले गावात येणार्या बंदुकीच्या गोळ्यांमुळे सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. मात्र भविष्यात होणार नाही, असे नाही. त्यामुळे कार्ले गावात येणार्या गोळ्या थांबविण्यासाठी उपाययोजना करायला हवी. काही तांत्रिका चुका होत असतील तर त्या सुधाराव्या लागतील. अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथे पोलिसांचे गोळीबार सराव केंद्र आहे. या ठिकाणी शंभर, दोनशे आणि तीनशे मीटर रेंजचा गोळीबार सराव केला जातो. येथे रायगड, नवी मुंबई, ठाणे, मुंबई येथील पोलीस कर्मचारी बंदुकीच्या गोळीबार सरावासाठी येत असतात. सराव करताना काही गोळ्या डोंगराच्या पलिकडील कार्ले गावात जाऊन पडतात. मागील चार वर्षांपासून या घटना अधूनमधून घडत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस, जिल्हा प्रशासन यांना अनेक निवेदने दिली. त्यानंतर गोळीबार सराव येथे 20 फुटाची भिंतही बांधण्यात आली तरीदेखील काही दिवसांपूर्वी परहूरपाडा येथे पोलिसांचा गोळीबार सराव सुरू असताना कार्ले गावातील मंगेश नाईक यांच्या घराच्या पत्र्यावरून पहिल्या मजल्यावरील एक इंच सिमेंट शीटमधून एक गोळी लादीवर पडली. दुसरी गोळी प्रफुल्ल पाटील यांच्या पत्र्यावरून भिंतीवर आपटून अंगणात पडली. यावेळी प्रफुल्ल पाटील यांच्या आई या भिंतीला टेकून बसल्या होत्या. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. वास्तविक परहूरपाडा आणि कार्ले या दोन गावांमध्ये दोन डोंगर आहेत. पोलीस जेथे सराव करतात तेथे 20 फुट भिंत बांधण्यात आली आहे. असे असताना बंदुकीच्या गोळ्या कार्ले गावात येतात, याबात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. परहूरपाडा येथील सराव केंद्र बंद करण्याची मागणी कार्ले ग्रामस्थांनी केली आहे. कार्ले गावात येणार्या गोळ्यांनी अद्यापपर्यत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झालेली नाही. मात्र येणार्या गोळ्यांमुळे कार्लेकर हे भयभीत झाले आहेत. त्यामुळे याकडे पोलीस प्रशासनाने गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. वास्तविक परहूरपाडा आणि कार्ले या गावांमध्ये बरेच अंतर आहे. दोन गावांच्यामध्ये दोन डोंगर आहेत. तसेच जेथे गोळीबाराचा सराव केला जातो, त्या रेंजच्या ठिकाणी 20 फूट भिंत उभारण्यात आली आहे. असे असताना बंदुकीच्या गोळ्या इतक्या लांब येतात कशा. काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकार्यांशी याबाबत चर्चा केली, तेंव्हा त्यांनी सांगितले की, सरावासाठी ज्या बंदुका वापरल्या जातात. त्यातून सुटणारी गोळी ही ठराविक अंतरापर्यंतच जाऊ शकते. हे जर खरं असेल तर गोळ्या गावात येतात कशा, याचा शोध घ्यायला हवा. कार्ले गावात येणार्या बंदुकीच्या गोळ्यांची कारणे शोधण्याचे आदेश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी अलिबाग पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पाहणी केली. अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दयानंद गावडे, राखीव पोलीस दलाचे निरीक्षक प्रकाश मोकल यांच्यासह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. चुकीच्या पद्धतीने गोळीबार केल्यास गोळी कार्ले गावात जाण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली. नव्याने बांधण्यात आलेल्या भिंतीची उंची आणि टार्गेट ठिकाण यामध्ये काही तांत्रिक चुका आहेत. त्यामुळे उभ्याने टार्गेट शूट करताना चुकून कर्मचार्याच्या हाताची दिशा बदलली तर गोळी सुसाट वेगाने डोंगर पार करून कार्ले गावात जाऊ शकते. असा अंदाज या पथकाने व्यक्त केला आहे. या पथकाने काही सूचनादेखील केल्या आहेत. रेंजच्या ठिकाणी बांधलेल्या भिंतीवरून गोळीबार सराव न करता जमिनीवरून गोळीबार करावा. रायगड पोलीस दलाच्या जवानांकडून जेंव्हा गोळीबाराचा सराव केला जातो, तेंव्हा गोळ्या कार्ले गावात येत नाहीत, असे सांगितलं जातंय. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील पोलीस येथे सराव करत असतील तेव्हा रायगड पोलिसांचे दोन जवान तेथे उपस्थित ठेवावेत, टार्गेट ठिकाणचा भराव काढून टाकावा अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिल्या आहेत. पोलीस अधीक्षकांनी तातडीने चौकशी करून काही उपाययोजना करण्याचे आदेश दिले, हे चांगले झाले. पंरतु या तात्पुरत्या उपाययोजना आहेत. काही तज्ज्ञ लोकांकडून परहूरपाडा येथील पोलीस गोळीबार सराव केंद्राची पाहणी करून अभ्यास करण्यास सांगितले पाहिजे. त्यांनी काही कायमस्वरूपी उपाययोजना सूचविल्या तर त्या केल्या पाहिजेत. गोळीबार सराव केंद्रातच काही तांत्रिक चुका असतील तर त्यादेखील दुरूस्त केल्या पहिजे.
-प्रकाश सोनवडेकर