नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या 29 सामन्यांनंतर बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला, मात्र यानंतरही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतात आयपीएल खेळवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या आयोजनावरून टीका होत आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत आयोजित करण्यात आली होती. यंदाही गव्हर्निंग काऊन्सिलने तो पर्याय समोर ठेवला होता, परंतु त्याला केराची टोपली दाखवत भारतात स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कोलकाता नाइट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती व संदीप वॉरियर्स, सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी व गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांच्यासह दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बीसीसीआयने तातडीची बैठक घेऊन स्पर्धा स्थगितीचा निर्णय जाहीर केला.
या निर्णयानंतर भारतात आयपीएल आयोजनाचा निर्णय चुकला का, असा सवाल सौरव गांगुली यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, नाही. आम्ही जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा कोरोना रुग्णांचा आकडा एवढा नव्हता. इंग्लंड मालिकेचे यशस्वी आयोजन आम्ही केलेच होते. तसेच फेब्रुवारीत देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होती.
आयपीएल स्थगितीनंतर बीसीसीआयसमोर नवे आव्हान
आयपीएल स्थगित करण्याच्या निर्णयानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षित त्यांच्या घरी पोहचवण्याचे आव्हान बीसीसीआयसमोर आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे अनेक देशांनी भारतातून येणार्या विमानसेवा रद्द केल्या आहेत. त्यामुळे परदेशी खेळाडूंना मायदेशात पाठवण्याची सोय करण्यासाठी आयपीएलचे लॉजिस्टीक मॅनेजर आणि प्रत्येक फ्रँचायझींचे सदस्य अहोरात्र मेहनत घेत आहेत. मंगळवार दुपारपासून आम्ही खेळाडूंच्या घरवापसीसाठी काम करीत आहोत आणि त्या दृष्टीने आखणी करतोय, परंतु प्रत्येक अर्ध्या तासाने त्यात बदल करावा लागत आहे, असे पंजाब किंग्जच्या अधिकार्याने सांगितले.