मुंबई ः प्रतिनिधी
भारताच्या पारंपरिक खो-खो क्रीडा प्रकारात संघात्मक पातळीवर बदल करण्याचे भारतीय खो-खो महासंघाने ठरवले आहे. त्यानुसार आता एप्रिलमध्ये सुरू होणार्या नव्या मोसमापासून किशोर-किशोरी, कुमार-कुमारी आणि पुरुष, महिला अशा सर्व संघांत 12 ऐवजी 15 खेळाडूंच्या समावेशाला मान्यता देण्यात आली आहे.
एप्रिलपासून होणार्या सर्व स्पर्धांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे निर्देश खो-खो महासंघातर्फे सर्व राज्य संघाना काढण्यात आले आहे. खो-खो खेळामध्ये जसा वेग आहे, तसा धोकाही अधिक आहे. खेळाडू जखमी होण्याचे प्रमाणही तसेच अधिक आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक खेळाडू जखमी झाल्यास पूर्वीच्या 12 खेळाडूंच्या संघरचनेत प्रशिक्षकांसमोर बदली खेळाडूंचे पर्याय कमी असायचे.
भारतीय खो-खो महासंघाच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महासंघाचे सहसचिव आणि महाराष्ट्र खो-खो संघटनेचे माजी सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर विचारविनिमय आणि संलग्न संस्थांची मान्यता घेऊन या बदलाची माहिती भारतीय खो-खो महासंघाने सर्व संलग्न संघटनांना कळवली आहे. महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी यांचे पत्र नुकतेच सर्व राज्य संघटनांना पाठवले आहे.
या निर्णयामुळे आता खो-खोचा संघ 19 जणांचा राहील. यात 15 खेळाडू (नऊ खेळणारे आणि सहा राखीव), प्रशिक्षक, व्यवस्थापक, सरावतज्ज्ञ आणि साहाय्यक मार्गदर्शक अशी संघरचना असेल. महासंघाने केवळ खेळाडूंची संख्या वाढवली आहे. खेळाच्या नियमात आणि खेळण्याच्या पद्धतीत कुठलाही बदल केलेला नाही.