मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड अभयारण्य आगीपासून सुरक्षित रहावे, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जळीत रेषा काढण्याचे काम वेगात सुरु आहे. या कामात विहूर आदिवासी वाडीतील तरुण मदत करीत आहेत. मुरूड तालुक्यातील सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य पसरले आहे. या अरण्यात वन्यजीवांसह असंख्य पक्ष्यांच्या जाती आहेत. शेकरूसारखा दुर्मिळ प्राणी, रानगवेसुद्धा आहेत. बिबट्यांची संख्याही वाढत आहे. हे अभयारण्य आगीपासून सुरक्षित रहावे, यासाठी फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नवाबांचा राजवाडा ते विहूर परिसर अशी जळीत रेषा काढण्याचे काम सुरु आहे. सुके गवत व झाडी झुडपे जाळून टाकली जात आहेत. वनरक्षक अरुण पाटील यांनी विहूर आदिवासीवाडीतील तरुणाशी संपर्क साधून जळीत रेषा काढण्यासाठी मदत मागितली. त्याला प्रतिसाद देत या आदिवासीवाडीचे अध्यक्ष लक्ष्मण पवार व उपाध्यक्ष संजय वाघमारे यांच्यासह अनेक तरुण जळीत रेषा काढण्याच्या कामात मग्न झाले आहेत.