Breaking News

फेसबुकवर मुलीशी मैत्री महागात; रायगडात 50 जणांना फटका

अलिबाग : प्रतिनिधी
फेसबुकवर मुलीशी मैत्री करताय, मग सावधान! अन्यथा तुम्हाला लाखोंचा चुना लागू शकतो. रायगड जिल्ह्यातील साधारण 50 जणांना फेसबुक मैत्रीचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यात अलिबागमधील दोन जणांचा समावेश आहे. समाजात आपली बेइज्जत होईल या भीतीने पोलिसांत तक्रार करण्यास अनेक जण पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
फेसबुक या सोशल साईटवर काही दिवसांपासून तरुणी मैत्रीच्या रिक्वेस्ट पाठवितात. समोरून सुंदर तरुणीची आलेली रिक्वेस्ट पाहून तरुण मंडळींसोबत वयस्क व्यक्तीही हुरळून जातात. आलेली मैत्री रिक्वेस्ट कोणतीही शहानिशा न करता स्वीकारतात आणि जाळ्यात अडकतात. त्यानंतर सुरू होतो व्हिडीओ कॉलिंग सिलसिला. समोरची तरुणी फेसबुकवर गोडगोड संभाषण करून मोबाईल नंबर घेते. त्यानंतर व्हॉटसअ‍ॅपवर व्हिडीओ कॉलिंग करून समोरच्या पीडित व्यक्तीस गुंडाळण्यास सुरुवात करते. व्हॉटसअ‍ॅपवर रेकॉर्ड केलेली अश्लील चित्रफीत लावून समोर स्वतः असल्याचे भासवते. त्यामुळे समोरील पीडित व्यक्तीच्याही भावना चाळवतात आणि तिथेच फसतात. त्यानंतर समोरील तरुणी ही व्हिडीओ रेकॉर्ड करून त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात होते. समाजातील लाजेखातर फसलेला व्यक्ती हा त्या तरुणीला पैसे देऊ लागतो. अलिबागमध्येही अशा प्रकारे दोन जणांची साधारण अडीच लाख रुपयांची फसवणूक झाली आहे, मात्र याबाबत कोणीही तक्रार करण्यास पुढे आले नसल्याने ’तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 50 जणांना अशा मैत्रीचा मोठा फटका सहन करावा लागला आहे.

फेसबुकवर मैत्री करून फसवणूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील अनेकजण या मोहजाळ्यात अडकले असून आर्थिक फसवणुकीचे बळी पडले आहेत. त्यामुळे फेसबुकवर येणार्‍या अशा मैत्रीच्या रिक्वेस्ट स्वीकारू नका तसेच फसले गेल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा सायबर सेलकडे तक्रार करा. पोलीस नेहमीच आपल्या पाठीशी आहेत.
-राजन जगताप, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, रायगड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply