भाजप नेते किरीट सोमय्या यांची घणाघाती टीका
पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यातील कोरोनाची भयंकर परिस्थिती पाहता जनतेला विश्वासात घेऊन नियोजन करण्याची आणि निर्णय घेण्याची गरज असताना ठाकरे सरकार मात्र स्वतःच्या बचावासाठी राज्यातील जनतेची फसवणूक करीत आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 12) येथे केली.
पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोनासंदर्भात सोयीसुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून किरीट सोमय्या यांनी नवीन पनवेल येथील आरोग्य केंद्र, पनवेलमधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय आणि डॉ. पटवर्धन रुग्णालय येथे पाहणी, तसेच आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन आढावा घेतला. त्यानंतर मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभाराचे वाभाडे काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील परिस्थिती माहिती आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला.
या पत्रकार परिषदेस भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, सहकार सेलचे उत्तर रायगड संयोजक कुंडलिक काटकर आदी उपस्थित होते.
सचिन वाझेच्या लेटरबॉम्बमध्ये अनिल परब यांचा उल्लेख आहे. याशिवाय पोलीस भरती घोटाळा, आरटीओ घोटाळा असे अनेक घोटाळे समोर येत आहेत, असे नमूद करून आज सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची, तर उद्या दिल्लीला सीआयडी यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले, तसेच सचिन वाझे प्रकरण किमान दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा करीत एनआयए, सीआयडी, ईडी, इन्कम टॅक्स आदी विभागांच्या माध्यमातून त्याचा तपासा सुरू असल्याची माहिती दिली. पनवेल परिसरातील रुग्णालयांना भेट देऊन तेथील वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधत रुग्णांच्या योग्य उपचारांसंदर्भात चर्चा केली असल्याचे या वेळी त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तराला देताना सांगितले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आणखी ऑक्सिजन प्लांट प्रकल्प कार्यान्वित केल्याचे मागील वर्षीच सांगितले. मग ऑक्सिजनचा पुरवठा नसल्याने अनेक रुग्णांच्या जीवाशी या सरकारने का खेळ केला, असा सवाल करून कोविड विषाणूची लाट दुसर्या टप्प्यात असताना उद्धव ठाकरे आणि त्यांची सहकारी मंडळी सचिन वाझे प्रकरणात स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी नमूद केले. एका बेडवर तीन-चार रुग्ण, खुर्चीत रुग्ण, व्हरांड्यात रुग्ण ही परिस्थिती राज्य सरकारच्या अपयशी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेवर आली असल्याचे त्यांनी अधोरेखित करून मुंबई महापालिका व ठाकरे सरकारची मोठी लबाडी सुरू आहे, असाही आरोप केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने महाराष्ट्राला कोरोना लसीचे एक कोटी डोस दिले, तर येत्या 30 दिवसांत आणखी एक कोटी डोस राज्याला मिळणार आहेत. रेमसेडिवीर इंजेक्शन, लसींचे नियोजन करण्याचे काम राज्य सरकारचे आहे, मात्र लोकांचा विचार न करता राजकारण करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याचे सोमय्या म्हणाले. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्स, उपचार याबाबतीत तर राज्य सरकारने विचार केला नाही. त्यामुळे राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली तसेच मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी 24 ते 48 तास लागत आहेत. याला जबाबदार कोण तर राज्य सरकारच आहे, असा हल्लाबोलही त्यांनी आघाडी सरकारवर केला.
कर्नाळा बँक घोटाळ्याला ठाकरे सरकारचे संरक्षण
कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या वाहनांची जप्ती झाली, पुढे काय? या पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, कर्नाळा बँक घोटाळ्याला ठाकरे सरकारने संरक्षण दिले आहे, असे अधोरेखित केले. कर्नाळा बँक घोटाळ्याचा मागोवा घेत आम्ही सातत्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, मात्र हे राज्य सरकार घोटाळेबाजांवर कोणतीही कारवाई करीत नाही, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
कोरोना काळात भाजपकडून सर्वसामान्यांचा विचार -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना, कोरोना काळात भाजपच्या वतीने सर्वसामान्यांचा विचार आणि सूचनांचा विचार करून त्यांना आवश्यक मदत करण्याचे काम केल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, मागील वेळीसुद्धा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एमजीएम कामोठे रुग्णालय, इंडिया बुल विलगीकरण केंद्राला भेट देऊन आढावा घेतला होता. त्याच धर्तीवर त्यांनी आज आरोग्य केंद्र, रुग्णालयांना भेट देऊन डॉक्टरांशी, तसेच आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी चर्चा करीत रुग्णांची योग्य उपचारातून काळजी घेण्याची सूचना केली आहे. सध्या पनवेल परिसरात दरदिवशी पाचशेहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता लक्षात घेऊन तशी मागणी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.