Breaking News

राज्य सरकारी कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार

अलिबाग : प्रतिनिधी

जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्याकरिता महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी व शिक्षक येत्या 23 व 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप करणार आहेत. या संपात रायगड जिल्ह्यातील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याकडे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप नागे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. या वेळी संघटनेचे सरचिटणीस प्रभाकर नाईक, कोषाध्यक्ष दर्शना पाटील, प्रफुल्ल कानिटकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने आरोग्य विभागासह सर्वच विभागात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेतले आहेत. कंत्राटी कर्मचारी तुटपुंजा मानधनावर वर्षानुवर्षे सेवा करीत आहेत. पण त्यांच्या सेवा नियमित केल्या जात नाहीत. कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित सेवेत घेण्यासंदर्भात सातत्याने संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे.  सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेवून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा ही संघटनेची मागणी आहे. सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी व बंधपत्रित कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरा व अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट करा, चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घ्या, चतुर्थश्रेणी कर्मचारी, जि. प. कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवा, लिपीकवर्गीय कर्मचारी व अन्य कर्मचार्‍यांच्या वेतनश्रेणी त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचारी, कोतवाल, आशा, अंगणवाडीताई, महिला परिचरसह सर्व कंत्राटी कर्मचारी व शिक्षकांना किमान वेतन द्या व त्यांना पेन्शन योजना लागू करा, इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संबंधितांसोबत निर्णायक चर्चा करा आदी मागण्या आहेत.

Check Also

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल …

Leave a Reply