कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाजवळील पुलाची येथे लोको शेड उभारण्यात येत आहे. तेथे रेल्वे गाड्या उभ्या रहाण्यासाठी फलाट बांधण्याचे काम ठेकेदारी पद्धतीने चालू आहे. तेथे महावितरणच्या अधिकार्यांनी धाड टाकून वीजचोरी पकडली मात्र किरकोळ कारवाई करून ठेकेदाराला सोडून देण्यात आले. कर्जत रेल्वे स्टेशनजवळच पुलाचीवाडी परिसरात लोको शेड, रेल्वे गाड्या उभ्या रहाण्यासाठी फलाट बांधण्याचे काम ठेकेदारी पद्धतीने चालू आहे. याठिकाणी कामगारांना रहाण्यासाठी शेडदेखील ठेकेदाराने बांधून दिल्या आहेत. तेथे आकडा टाकून वीज चोरी केली जात होती. ते ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी महावितरणच्या कर्जत कार्यालयात तक्रार केली. तेथे धाड टाकून महावितरणच्या अधिकार्यांनी वीज चोरी पकडली. मात्र वीज कंपनी कायदा 135 यानुसार कारवाई होणे बंधनकारक असताना ठेकेदारावर तकलादू कारवाई करून थोड्याच रक्कमेची वसुली केल्याचे निदर्शनास येत आहे. त्याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदरची वीज चोरी तीन महिन्यांपासून होत होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र त्याबाबत माहिती देण्यास महावितरणचे कर्जत येथील उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके हे सहकार्य करत नसल्याने या प्रकरणात गौडबंगाल असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कोरोना काळात वीज बिल भरले नाही म्हणून सर्वसामान्य ग्राहकांची वीज विनाविलंब तोडणारे, वीज चोरी प्रकरणी नियमानुसार सर्वसामान्य नागरिकाला हजारोंचा दंड ठोकणारे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज चोर ठेकेदाराला पाठीशी का घालत आहेत ? असा सवाल आता या प्रकरणात उपस्थित झाला असून, या प्रकरणी उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके, सहाय्यक अभियंता डफळ आणि या विभागात काम करणारे वायरमन यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.