रमजान काळात मुस्लिम तरुणांकडून पुण्यकर्म
कर्जत : बातमीदार – कोरोनाच्या महामारीत लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी कामानिमित्त असलेले लोक अडकून पडले आहेत. त्यातील काही जणांनी चालत परतीचा मार्ग धरला आहे. कर्जत तालुक्यातील कळंब येथे असेच उत्तर प्रदेश येथे निघालेले नागरिक पोहोचले तेव्हा कळंब येथील मुस्लिम तरुणांनी त्यांची राहण्याची सोय करून प्रशासनाला त्यांना इच्छितस्थळी मार्गस्थ करण्याची विनंती केली.
लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. अशा वेळी घराच्या ओढीने अनेक कुटुंबांनी पायीच गावाकडे प्रयाण केले आहे. खोपोली येथे मजूर काम करणारे 60 ते 70 जण कर्जत तालुक्यामार्गे उत्तर प्रदेशला निघाले होते. रस्त्यावरून निघालेले लोक पाहिल्यानंतर कळंब येथील मुस्लिम तरुणांनी त्यांची विचारपूस केली तेव्हा आपण सर्व जण उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील राहणारे असूनम आपल्या गावी चालत निघाले असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी कळंबच्या मुस्लिम तरुणांनी पांथस्तांना थांबवून चहा-बिस्कीट दिले. तसेच हे सर्व भरउन्हात पायी चालत आल्यामुळे त्यांच्यातील लहान मुले व महिलांच्या पायाला इजा झाली होती. मुस्लिम तरुणांनी त्या सर्वांची आरोग्य तपासणी स्थानिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांकडून करवून घेऊन या मंडळींची व्यवस्था गावातील फुरकान यांच्या घरी केली. त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे व नायब तहसीलदार यांना या कामगारांबद्दल माहिती दिली. शिवाय प्रशासनाच्या साहाय्याने या कामगारांचे ऑनलाइन फॉर्म भरून त्यांना मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना सध्या सुरू आहे. मुस्लिम समाजाचे आदरणीय असलेले मोहमद पैगंबर यांच्या शिकवणीप्रमाणे भुकेलेल्या अन्न दिले पाहिजे या प्रमाणे उत्तर प्रदेशकडे जाणार्या सर्व मजूर व त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी कळंब गावातील मुस्लिम समाजाने घेतली आहे.