Breaking News

वाघ, सिंह आणि गिधाडे

शिवसेनेचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भारतीय जनता पक्षावर यथेच्छ तोंडसुख घेतले. सध्या गोव्याच्या निवडणुकीत प्रभारी या नात्याने गुंतलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील त्यांनी अकारण टीकेची झोड उठवली. राऊत यांच्या आप्तेष्टांची सध्या ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यातून काही भानगडी बाहेर येण्याची शक्यता आहे का? म्हणून शिवसेना प्रवक्त्यांचे वास्तवाचे भान सुटले का, असे प्रश्न कुणालाही पडतील, पण त्याची उत्तरे येणारा काळच देऊ शकेल. राजकीय नेत्यांची भाषा बदलू लागली की निवडणुकांची हवा तापू लागली आहे हे कोणीही ओळखू शकेल. एरव्ही परस्परांच्या सौहार्दाबद्दल एकमेकांची पाठ थोपटणारे राजकीय नेते निवडणुका आल्या की बेताल बडबड सुरू करतात. अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळून. काही नेते तर निवडणुका असोत किंवा नसोत, बेताल बडबडीचा आपला उद्योग बारा महिने सुरू ठेवतात. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी असे करावेच लागते, अशी काहीतरी त्यांची गैरसमजूत असावी. वारेमाप वक्तव्ये करून वर्तमानपत्रातील मथळे मिळवता येतात किंवा टीव्ही वाहिन्यांवरदेखील चमकता येते हे अशा नेत्यांना महत्त्वाचे वाटते. राजकारणात टिकून राहण्यासाठी हा शॉर्टकट वापरणार्‍या नेत्यांची आपल्या देशात कमतरता नाही, परंतु याच प्रवृत्ती आता महाराष्ट्रामध्ये पाय रोवताना दिसत आहेत याचे मात्र दु:ख होते. ईडीच्या कार्यालयामध्ये भाजपचे काही नेते अनधिकृतरित्या बसतात आणि विरोधकांना छळण्याचे आदेश देतात. ईडी ही गुंडांची टोळी झाली असून तेथे वसुली आणि ब्लॅकमेलिंगचे रॅकेट चालते, अशा प्रकारचे सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी बुधवारी केले. इतकेच नव्हे तर ईडी कार्यालयाच्या समोर पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी सगळा पर्दाफाश करू. शिवसेना हाच एक मुंबईतला दादा आहे. बाकीच्यांची दादागिरी खपवून घेणार नाही अशी वारेमाप वक्तव्ये करतानाच राऊत यांनी थेट फडणवीस यांनाच आव्हान दिले. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरला जाणे अशक्य होईल अशी धमकीची भाषादेखील त्यांनी केली. हे सारे तपशीलात सांगण्याचे कारण असे की राऊत यांनी अचानक इतका आक्रमक पवित्रा का घेतला या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याच वक्तव्यांमध्ये दडलेले आहे. ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी तोंडसुख घेतले, ते अतिशय प्रगल्भ व संयत व्यक्तिमत्वाचे नेते मानले जातात. त्यांना धमकी देण्यापर्यंत मजल कशी गेली आणि का, हा खरा प्रश्न आहे. फडणवीस यांनी राऊत यांच्या आरोपांची फारशी दखल घेतली नाही हे बरेच झाले. राऊत यांनी दिलेल्या धमकीबाबत विचारणा केली असता फडणवीस एवढेच म्हणाले की, सिंह कधी गिधाडांना घाबरत नसतो. राऊत यांची जीभ कितीही घसरली तरी फडणवीस यांनी संयम पाळला हेच यातून दिसून येते. परस्पर सौहार्दावर भाजपचे नेते आणि विशेषत: फडणवीस यांचा प्रगाढ विश्वास आहे. लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी गोव्यात अडकलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ऐनवेळी फडणवीस यांच्या विशेष विमानातूनच मुंबईत परतल्या. गोव्याच्या भूमीत शिवसेनेचे नेते भाजपच्या विरोधात विखारी प्रचार करत असूनही फडणवीस यांनी सौहार्दाचा संस्कार पाळला. राऊत यांच्यासारख्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील त्यांचा कित्ता गिरवायला हरकत नाही.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply